महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रायगडचा दौरा करत मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. गेल्या १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे. यावरून राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राजकीय हस्तक्षेपामुळे हा मुंबई-गोवा महामार्ग रखडला असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपानंतर आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीवरून रामदास कदम यांनी मनसेला डिवचलं आहे. “राज ठाकरे आतापर्यंत झोपले होते का?”, अशा खोचक शब्दांत रामदास कदमांनी मनसेवर टीका केली आहे.

रामदास कदम काय म्हणाले?

“राज ठाकरे यांना आज एकदम अचानक कोकणाचा पुळका आला. मी त्यांना पुतना-मावशी म्हणणार नाही. मात्र, राज ठाकरे हे कोकणाच्या दौऱ्यावर एकटेच का आले? त्यांच्या या दौऱ्यावेळी त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरेही का नाही आले? दोघांनी मिळून रस्त्यावरील खड्डे पाहिले असते, तर महाराष्ट्रात आणखी चांगला मेसेज गेला असता. म्हणजे दोघे बंधू एकत्र येऊन मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी करतात. मग आणखी मोठं वलय मिळालं असतं”, अशा शब्दांत रामदास कदम यांनी टीका केली.

“राज ठाकरे तुम्ही आतापर्यंत काय झोपले होते का? की तुम्हाला उशीरा सुचलेलं शहाणपण आहे. मग ते कोण राजकारणी आहेत, ते कोण सत्ताधारी आहेत ते सांगा ना. बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला ना. कुठेतरी पाण्यात दगड मारण्यापेक्षा तुम्ही नाव घेऊन बोला ना. तुमचं आडनाव ठाकरे आहे, तुमच्यामध्ये आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना पाहतो. तुम्ही स्पष्टपणे बोला ना”, अशी टीका रामदास कदम यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

राज ठाकरे यांनी काय म्हटलं होतं?

“राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्ग होत नाहीये. मी याबाबत मागे नितीन गडकरींनाही फोन केला होता. ते म्हणाले होते की कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेले आहेत. नितीन गडकरी हे रस्ते विभागाचे केंद्रीय मंत्री आहेत. ते कोकणातील कंत्राटदारांबद्दल कंटाळून निघून गेले असं बोलत असतील तर ते कोणाला कंटाळून निघून गेले?” असा सवाल राज ठाकरेंनी केला होता.

“आतापर्यंतची पद्धत अशी आहे की तुम्हाला रस्ता बांधायचा असेल तर जमिनीचं संपादन सरकारने करून द्यायचं असतं. हे सगळे रस्ते करत असताना हाच प्रोब्लेम झाला. सरकारने जमिन संपादित करून दिली नाही. कंत्राटं दिली, टक्केवारी दिली. रस्ता तिथेच आहे. वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. मी आता नवीन बांधलेल्या रस्त्यावरून आलो, काय अवस्था आहे या रस्त्याची? नवीन बनवलेल्या रस्त्याची ही अवस्था असेल तर बायपासची गरज काय?”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

“विकास करताना टक्केवारीचाच विचार केला जात आहे. आमच्या जमिनी कशा विकल्या जातील हाच व्यवहार सुरू आहे. आता सध्या तिसऱ्या मुंबईचं सुरू आहे. तिसऱ्या मुंबईमध्ये एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, डेटा सेंटर, ग्लोबल संस्था, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ असणार आहेत. पण हे महाराष्ट्रातील मुलांनाही माहिती नाही. इथले स्थानिक माजी जमीन मालक म्हणूनच इथे राहणार त्याच्या समोर ही तिसरी मुंबई तयार होणार. या तिसऱ्या मुंबईबाबत पेण, पनवेल, रायगडच्या मुलांना आपण तयार करतोय का? शहरं उभी करायची, रस्त्यांची वाट लावायची आणि जमिनी विकण्याचा धंदा सुरू आहे. विकासाला विरोध करायचा नाही, पण कोकणातील विकास पाहिला तर असा विकास नको असं वाटतं”, असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला.

“महाराष्ट्रातील पोरांची प्रगती होत नसेल तर चाटायची आहे का ही जमीन आहे? विकास कुठे होणार आहे हे आमदारांना माहितेय. मग ते तिथे जमिनी विकत घेणार. मग सरकार अदानी वगैरेंना या जमिनी विकणार. हे राजकारण्यांना माहितेय. स्थानिकांना हे समजणं गरजेचं आहे. सगळीकडे तटकरे आणि त्यांची मुलगी, ठाकूर आणि त्यांचा मुलगा, हेच सुरू आहे. आमच्या लोकांना समजत नाही”, असं म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली होती.