उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची मोठी चर्चा सुरू असून ठाकरे सेनेचे ६ खासदार फुटल्याची चर्चा आहे. याबाबत दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून या सर्व खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आला होता, पण तरीही हे ६ खासदार बैठकीला अनुपस्थित‍ राहिले आहेत. त्यामुळे आता हे ६ खासदार फुटल्याचं मानलं जात आहे.

‘ऑपरेशन टायगर’वरून सध्या आरोप-प्रत्यारोपाने राजकारण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच ‘ऑपरेशन टायगर’वरून रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेत फक्त तिघेजणच राहणार असल्याची टीका करत रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

रामदास कदम काय म्हणाले?

“संजय राऊत काय बोलत आहेत? ही भाषा त्यांना शोभते का? संजय राऊतांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना शिवीगाळ केली. महाराष्ट्र त्यांना पाहतोय. पण शिवसेना ठाकरे गटावर ही वेळ का आली? उद्धव ठाकरे यांना सोडून आमदार, खासदार, मंत्री, पक्षाचे नेते, जिल्हा प्रमुख का सोडून जात आहेत? हे सगळं कोणामुळे होत आहे? उद्धव ठाकरेंना माझं सांगणं आहे, मराठी माणसांची शिवसेना संपत आहे, शिवसेना तुमच्या एकट्याची नव्हती”, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

“मी उद्धव ठाकरे यांना हेच सांगेल की तुम्ही पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करा. तुमच्यावर ही वेळ का आली? तुम्हाला सोडून आमदार, खासदार, मंत्री, पक्षाचे नेते, जिल्हा प्रमुख का जात आहेत? तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात, मग तुमच्या आजूबाजूला असं काय आहे की ज्यामुळे राजकारणात तुमची नाचक्की होत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्राला जो हदरा बसला, याचं उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं. अन्यथा प्रत्येकाला तुम्ही हेच सांगणार आहात का? की गेट आऊट, चालते व्हा. मला काही फरक पडणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी जे उभा केलं होतं, ते सर्व कोसळताना आता महाराष्ट्र पाहात आहे. मात्र, अजूनही उद्धव ठाकरे यांच्यात परिवर्तन का होत नाही?”, असा सवाल रामदास कदम यांनी केला.

‘ठाकरेंच्या सेनेत फक्त तिघेच राहतील’ : रामदास कदम

“आता देखील संजय राऊत सांगत आहेत की, त्या खासदारांनी १५ कोटी घेतले, ५० कोटी घेणार आहेत. पैसे मोजायला कोण गेलं होतं? संजय राऊत गेले होते का? हे सहा खासदार आता का सोडून चाललेत, मंत्री पदावर असलेले १० जण तुम्हाला का सोडून गेले? ही साधी गोष्ट नाही. आता तुम्ही कुठे-कुठे ठिगळ लावणार आहात? तुमच्या पक्षात आता कोणीही थांबणार नाही. फक्त उद्धवजी, वहिनी आणि आदित्य ठाकरे हे तिघेच ठाकरेंच्या सेनेत राहतील”, असं म्हणत रामदास कदम यांनी टीका केली.

“आता ठाकरेंच्या सेनेत जे २० आमदार आहेत, पुढच्या निवडणुकीपर्यंत ते जर ठाकरेंच्या सेनेतच थांबले तर त्यातला एकही निवडून येणार नाही. कारण आपल्या आमदारांच्या मतदारसंघाला निधी मिळावा, आपल्या आमदारांचे मतदारसंघ स्ट्रॉंग व्हावे म्हणून उद्धव ठाकरे कधीही पुढाकार घेत नाहीत”, असं म्हणत रामदास कदम यांनी टीका केली.