गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राबवण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’ची मोठी चर्चा सुरू आहे. शिवसेना (ठाकरे) पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर असून ठाकरेंच्या सेनेचे ६ खासदार फुटल्याची चर्चा आहे. हे खासदार फुटल्याच्या चर्चा समोर आल्यानंतर शिवसेनेकडून (ठाकरे) व्हिप जारी करण्यात आला होता. पण ठाकरे गटाच्या संसदीय दलाच्या या बैठकीला हे ६ खासदार उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे आता हे ६ खासदार फुटल्याचं निश्चित मानलं जात आहे. मात्र, असं असलं तरी अद्याप त्या ६ खासदारांची भूमिका समोर आलेली नाही.
ठाकरे सेनेच्या फुटलेल्या ६ खासदारांच्या संदर्भात आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. असं असतानाच शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सहा नाही, तर सातव्या खासदाराची देखील पत्रावर सही आहे, पण त्याला मंत्रिपदाचा शब्द हवा होता’, असा दावा रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. कदमांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटात पुन्हा खळबळ उडाली आहे.
रामदास कदम काय म्हणाले?
“तुमच्या (उद्धव ठाकरे यांच्या) आजूबाजूचे जे लोक आहेत, ते तुम्हाला फसवत आहेत. सहा नाही, तर सातव्या खासदाराची देखील त्या पत्रावर सही आहे आणि तो खासदार आज तुमच्या (उद्धव ठाकरे) बाजूला बसला आहे. तो सातवा खासदार मंत्रिपदाची मागणी करत होता. मला आधी मंत्रिपदाचा शब्द द्या, असं तो सातवा खासदार म्हणत होता. त्या सातव्या खासदाराने देखील त्या पत्रावर सही केलेली आहे. मात्र, तोच तुमच्या बाजूला आता बसत आहे. उद्धवजी हे तुम्हाला फसवत आहेत, हे लोक तुमच्या भोळेपणाचा फायदा घेत आहेत”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
खासदारांनंतर आमदारही फुटणार? शंभूराज देसाई यांचा दावा
‘ऑपरेशन टायगर’वरून सध्या आरोप-प्रत्यारोपाने राजकारण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी एक मोठा दावा केला. शंभूराज देसाई म्हणाले की, “काही प्रतिनिधींनी मला माहिती विचारली होती तेव्हाच मी सांगितलं होतं की, ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये खदखद आहे, अस्वस्थता आहे. कारण शेवटी आम्ही सर्वांनी एकत्र काम केलेलं आहे. आताही सभागृहात आमच्या एकमेकांच्या गाठीभेटी होत असतात. या ६ खासदारांच्या माध्यमातून खदखद बाहेर आलेली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची परिस्थिती देखील या ६ खासदारांपेक्षा वेगळी नाही.”
ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता?
“ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये खासदारांपेक्षाही जास्त खदखद आहे. कारण पक्षाच्या नेतृत्वाकडून पाठबळ मिळत नाही. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या दरबारी जी काही कामे प्रलंबित आहेत, त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी पक्षाचं नेतृत्व त्यांना मदत करत नाही. मग लोकांना काय उत्तर द्यायचं? लोकांनी निवडून दिलेलं असतं. मतदारसंघातील प्रश्न कसे सोडवायचे? अशी खदखद ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये आहे. त्यामुळे कदाचित खासदारांच्या बाबतीत जे घडलं, त्याची आमदारांच्या बाबतीत पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही”, असं शंभूराज देसाई यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.
फुटलेल्या ६ खासदारांबाबत आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं?
ठाकरे सेनेच्या फुटलेल्या या ६ खासदारांबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर आता आमदार आदित्य ठाकरे यांची देखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “आज आपला ६० वा वर्धापन दिन. पण पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
“कितीही कारणे द्या…सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं आहे. स्वतःला तर विकलंच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचं नाव आणि तुमच्या कुटुंबाचं नावही पणाला लावलं आहे. महाराष्ट्र हे घाणेरडं राजकारण मुळीच सहन करणार नाही. ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
