scorecardresearch

ठाकरे गटातील नेत्यांचे श्रीलंका, सिंगापूर आणि लंडनमध्ये हॉटेल्स? रामदास कदमांचं मोठं विधान, म्हणाले…

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

ramdas kadam

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी कदम परिवाराला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी कसे प्रयत्न केले, याबाबतचे अनेक खुलासे रामदास कदम यांनी केले. दरम्यान, त्यांनी श्रीलंका, सिंगापूर आणि लंडन येथील हॉटेल्सचा उल्लेख करत ठाकरे गटावर निशाणा साधला.

“योगेश कदम याला कसं संपवायचं? यासाठी ठाकरे गटाकडून षडयंत्र रचलं जात होतं. उदय सामंतही तेव्हा त्या गटात होते. कटात नव्हते. तो बदमाश सुभाष देसाई सगळ्यात पुढं होता. उद्धवजी, बाळासाहेब ठाकरे रामदास कदमसारख्या वाघाला सांभाळायचे, तुम्ही सुभाष देसाईसारख्या शेळ्या-मेंढ्यांना सांभाळता हा तुमच्यातला फरक आहे, अशी जोरदार टीका रामदास कदम यांनी केली.

“ज्या रामदास कदमनं कोकणात खोकेच्या खोके वाटून तुमची उंची वाढवली. आज तुम्ही आमच्यावर खोक्यांचा आरोप लावत आहात, तुम्हाला लाज वाटली नाही का?” असा सावलही रामदास कदमांनी विचारला.

हेही वाचा- “योगेश कदमांना संपवायच्या षडयंत्राच्या बैठकीत मीही होतो” भरसभेतून उदय सामंतांची कबुली

रामदास कदम पुढे म्हणाले, “आज काही बोलत नाही. आमच्याकडे खूप गोष्टी आहेत. कुणाचे हॉटेल श्रीलंकेला आहेत? कुणाचे हॉटेल सिंगापूरला आहेत? कुणाचे हॉटेल लंडनला आहेत? अमेरिकेत कुणाच्या मालमत्ता आहेत? हे एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणल्याशिवाय रामदास कदम स्वस्थ बसणार नाही.” खोक्याची भाषा तुमच्या तोंडात शोभते का? असा प्रश्नही रामदास कदमांनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 20:08 IST