रविवारी मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट-भाजपावर सडकून टीका केली होती. तसेच भाजपा मिंध्यांच्या नेतृत्त्वात निवडणुका लढणार असेल तर ते त्यांनी ते जाहीर करावं, असं आव्हानही त्यांनी दिलं होतं. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – “सदू आणि मधू भेटले असतील त्याबाबत आम्ही…” राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर संजय राऊत यांचा टोला
काय म्हणाले रामदास कदम?
“उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेल्याने ते दुखी झाले आहेत. ज्या ४० आमदारांमुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्या ४० आमदारांना कसं बदनाम करता येईल, याचा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी हाती घेतला आहे. ते आम्हाला गद्दार म्हणतात, पण गद्दार नेमकं कोण? याचा निर्णय महाराष्ट्र करेन. आपल्या बापाच्या विचारांशी ज्यांनी गद्दारी केली, ते उद्धव ठाकरे इतरांना गद्दार कसे म्हणू शकतात? बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात संघर्ष केला. मात्र, त्याच काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मांडीवर बसून मुख्यमंत्री बनणाऱ्या उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही”, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
हेही वाचा – “…म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला”, सुहास कांदेंचा मोठा गौप्यस्फोट
“उद्धव ठाकरेंच्याच कपाळावर गद्दारीचा शिक्का”
“मुळात गद्दारीचा शिक्का खरं तर उद्धव ठाकरे यांच्या कपाळावर बसला आहे, तो आता कधीही पुसला जाणार नाही. भाड्याची माणसं आणून ते बेंबीच्या देठापासून ओरडले, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. भगवा झेंडा हातात घेण्याचा नैतिक अधिकार आता उद्धव ठाकरेंना नाही, तो अधिकार आता फक्त आम्हाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता कितीही ओरडले, तरी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार नाही”, असेही ते म्हणतात.
सुहास कांदेंच्या आरोपांवरही दिली प्रतिक्रिया
पुढे बोलताना त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांवरही प्रतिक्रिया दिली. “काल आमदार सुहास कांदे यांनी दोन कंत्राटदारांची नावं सांगितली. उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडून खोके घेतल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी नार्को चाचणीची करण्याचं आव्हानही दिलं. मात्र, उद्धव ठाकरे त्यांचं आव्हान स्वीकारणार नाही. बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे हुकूमशहा झाले, त्यांनी मिठाईच्या खोक्यांचं दुकान थाटलं. याचे साक्षीदार आम्ही आहोत”, असा दावाही त्यांनी केला.
संजय राऊतांनी केलेल्या टीकेवरही केलं भाष्य
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भाष्य केलं. “संजय राऊतांवर मला काहीही बोलायचं नाही. त्यांच्या मताला कोणीही किंमत देत नाही. ते निवडणूक आयोगाचा बाप काढतात, कोणावरही आरोप करतात, ते विधिमंडळाला चोरमंडळ म्हणतात. खरं तर महाराष्ट्र त्यांना कंटळाला आहे, त्यांना जास्त किंमत देण्याची गरज नाही”, असे ते म्हणाले.