scorecardresearch

“शिंदेंकडे बोट दाखवून उद्धवजी म्हणाले या शिवसैनिकाला मला मुख्यमंत्री बनवायचं आहे, रात्री १२ वाजता…”; रामदास कदमांनी सांगितला किस्सा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही रामदास कदमांनी केला उल्लेख

“शिंदेंकडे बोट दाखवून उद्धवजी म्हणाले या शिवसैनिकाला मला मुख्यमंत्री बनवायचं आहे, रात्री १२ वाजता…”; रामदास कदमांनी सांगितला किस्सा
दापोलीमधील सभेमध्ये रामदास कदमांचं विधान

रत्नागिरीमधील दापोली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांच्या मेळाव्यामध्ये भाषण करताना रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊ नये असा सल्ला आपण दिला होता, मात्र त्यांनी तो ऐकला नाही असं सांगतानाच कदम यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करण्याचा विचार उद्धव ठाकरेंच्या मनात होता असा गौप्यस्फोटही केला. एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवून या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे असं उद्धव ठाकरे शिवसेना नेत्यांच्या बैठकीत म्हणाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा केली असं कमद यांनी भाषणात सांगितलं.

नक्की पाहा >> “मी आजही फोन उचलून थेट उद्धव ठाकरेंशी…”; राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीसांचं विधान, शरद पवारांचाही केला उल्लेख

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वरुन ही सभा पाहून माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या, सोनिया गांधींच्या नादी लागून वाया गेला असं म्हणत असतील असं विधान रामदास कदम यांनी भाषणादरम्यान केलं. त्यानंतर बाळासाहेबांनी कमवलेलं उद्धव ठाकरेंनी गमावलं असा टोलाही कदम यांनी लगावला. इतकच नाही तर एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा विचार होता. तसं त्यांनी मढ येथील हॉटेलमध्ये झालेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत अगदी एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवत बोलून दाखवलं होतं, असा दावाही रामदास कदम यांनी केला. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कशाप्रकारे फसवलं गेलं याचे आपण साक्षीदार आहोत, असं कदम म्हणाले.

नक्की वाचा >> “मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो…” म्हणत रामदास कदमांचा हल्लाबोल; म्हटले, “बाळासाहेबांच्या आत्म्याला…”

“शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपवली या माणासाने संपवली. एक दिवस आधी मढच्या हॉटेलमध्ये उद्धवजींनी एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवून सांगितलं
की, हा शिवसैनिक याला मला मुख्यमंत्री बनवायचं आहे. मला नाही बनायचं मुख्यमंत्री असं ते म्हणाले,” अशी आठवण कदम यांनी भाषणामध्ये सांगितली. पुढे बोलताना कदम यांनी एका रात्रीत सूत्र फिरल्याचा दावा केला. यावेळेस त्यांनी शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा उल्लेख केला. “एक दिवस आधी झालं हे. एका रात्रीत काय नाटकं घडली. रात्री १२ वाजता संजय राऊत शरद पवारांच्या घरी गेले. माझी बायको रडते… डोकं आपटून घेते… तिला वर्षावर जायचंय.. तुम्ही मुख्यमंत्री व्हा सांगते. झाला गडी गुडघ्याला बाशिंग बाधून तयार एका रात्रीत,” असं म्हणत कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना लक्ष्य केलं.

नक्की वाचा >> “मला अमित शाहांवर विश्वास असून ते मला नक्की न्याय देतील, ते नेहमी…”; पुण्यामध्ये पत्रकारांसमोर सुप्रिया सुळेंचं विधान

पुढे बोलताना शरद पवार आणि राऊत यांच्या बैठकीनंतर दुसरीकडे, “एकनाथ शिंदे बिचारा विचार करतोय आपण मुख्यमंत्री झालो. त्यांच्या बंगल्यावर पोलीस बंदोबस्त लागला,” असं चित्र होतं असंही कदम म्हणाले. कदम यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत अचानक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा शरद पवारांनी केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याचा दावा केला. “अचानक दुसऱ्या दिवशी बैठकीत शरद पवार उठले आणि मुख्यमंत्री पदासाठी उद्धवजींचं नाव घेतलं. सगळे आवाक झाले. ही काय भानगड आहे? या शिवसैनिकाला मुख्यमंत्री व्हायचं होतं काय? कसा आघात केला. महापाप ज्याला म्हणता येईल. एकनाथ शिंदेंना कसं फसवलं गेलं याचा मी साक्षीदार आहे,” असं कदम म्हणाले.

नक्की वाचा >> “नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे…”; आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत रामदास कदमांचा टोला

यापूर्वीही अनेकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात स्पष्टीकरण देताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारची एकजूट व्हावी म्हणून उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं अशी सर्व पक्षश्रेष्ठींची इच्छा होती असं विधान अनेकदा केलं आहे. एकनाथ शिंदेंच्या नावाची भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा २०१९ मध्ये नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळी सुरु होती. ठाण्यामध्ये काही ठिकाणी असा उल्लेख असणारे बॅनरही लागले होते. मात्र नंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या