Ramdas Kadam speech Shivsena anniversary: शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिंदेसेनेच्या नेत्यांनी जोरदार फटकेबाजी करताना उबाठा गटाच्या संजय राऊतांवर टीका केली. “आमच्या अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी संजय राऊतांना दिला. बंडखोर खासदारांवर संताप व्यक्त करताना राऊतांनी ऑपरेशन तुडवाचा उल्लेख केला होता. यावरुन देखील कदमांनी राऊतांना समाचार घेत, “आम्ही शिवसैनिक आहोत, तुडवायची भाषा कोणाला करताय? हिंमत असेल तर खासदारांच्या केसाला धक्का लावून पाहा. तुमच्या घरात शिवसैनिक शिरतील आणि तोंड बंद करतील, फोडून काढतील”, असे कदम म्हणाले.
एकनाथ शिंदे खरे टायगर – रामदास कदम
शिवसेनेच्या वाटचालीतील 57 वर्षाचा मी साक्षीदार, असे म्हणत रामदाम कदमांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाल्याचे नमूद केले. उद्धव ठाकरे तुमच्यावर ही वेळ का आली? असा प्रश्न विचारत कदम यांनी आमदार, खासदार गेले उद्या उरलेले आमदार पण जातील, असे वक्तव्य केले. महाराष्ट्राचे खरे टायगर एकनाथ शिंदे असल्याचे मत यावेळी रामदास कदम यांनी व्यक्त केले. दिवगंत बाळासाहेब ठाकरे दोन दोन हातांनी एकनाथ शिंदेंना आशिर्वाद देत असतील, असेही कदम यावेळी म्हणाले.
श्रीकांत शिंदेंना युवासेनेचे प्रमुख करण्याची मागणी
रामदास कदम यांनी यावेळी ऑपरेशन टायगरबाबत डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अभिनंदन केले. “श्रीकांत शिंदेंना युवासेनेचे प्रमुख करा, तसेच राष्ट्रीय सरचिटणीस करुन टाका”, असा इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. दित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागायचं असेही कदम यावेळी म्हणाले. कदम यांनी राऊतांवर टीका करताना, संजय राऊतांमुळं उद्धव ठाकरेंना अधोगती सुरु झाली आहे, असे वक्तव्य केलं. तसेच, राऊत आमच्या नादी लागू नका असा इशाराही त्यांनी दिला.
गुलाब पाटील काय म्हणाले?
“एकनाथ शिंदे कोण आहे, ते एक टायगर आहेत. हे महाराष्ट्रात आणि देशात सिद्ध झाले. त्यावेळी ४० रेडे मुंबईत आले तर कापू असा इशारा देण्यात आला पण, आम्ही मुंबईत आलो आणि सत्ता स्थापन केली. ऑपरेशन टायगरवरुन काल देखील शिवीगाळ करण्यात आली”, असे पाटील म्हणाले. यावेळी पाटील यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. “राऊत तुम्हाला मराठीत बोलता येते पण, माझी अहिराणी शिवी ऐकली तर चार दिवस जागेवरुन उठणार नाही”, असे म्हणत पाटलांनी राऊतांचा ऐकेरी उल्लेख केला. बाळासाहेबांचा आत्मा यावेळी एकनाथ शिंदेंना शिवसेना वाचवली म्हणून आशिर्वाद देत असेल, असे पाटील म्हणाले.
