रत्नागिरी : महायुतीतील दोन ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा आमनेसामने आले असून, रामदास कदम आणि खासदार सुनील तटकरे यांच्यातील राजकीय संघर्षाने आता उग्र वळण घेतले आहे. ‘गटार’ या शब्दावरून सुरू झालेला वाद थेट वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला असून, दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे.
माजी मंत्री रामदास कदम यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला. तटकरे हे ‘एहसान फरामोश’ असल्याचा आरोप करत कदम यांनी जुन्या राजकीय घटनांचा दाखला देत त्यांच्यावर विश्वासघात केल्याची टीका केली.“गटारात दगड टाकून पाणी उडवून घ्यायचे नव्हते, तर माझ्या दारात कशाला आला?” असा सवाल करत कदम यांनी तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तटकरे याला तिकीट मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केले, निवडणुकीच्या काळात साथ दिली, मात्र त्याची जाणीव ठेवली गेली नाही, असा दावा त्यांनी केला.
कदम यांनी दापोली-खेड विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांचा उल्लेख करत तटकरे यांना मदत केल्याचे सांगितले. तसेच “ज्या ताटात खाल्ले त्याच ताटात छेद करण्याचे काम तटकरे करतात,” असा आरोप करत त्यांनी राजकीय विश्वासघाताचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, रामदास कदम यांच्या आरोपांना उत्तर देताना खासदार सुनील तटकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली.
कदम यांनी आपल्या वडिलांचा उल्लेख केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी हा प्रकार अयोग्य असल्याचे सांगितले. “१९८४ मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले, त्यावेळी माझे वय २९ वर्ष होते. कदमांनी माझ्या वडिलांचा उल्लेख करण्याची गरज नव्हती,” असे तटकरे म्हणाले. रामदास कदम यांच्यावर टीका करताना तटकरे यांनी त्यांची अवस्था कुत्रा चावलेल्या व्यक्तीसारखी झाली असल्याचे म्हटले.
त्यांनी कदम यांच्या वक्तव्यांवरून तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत राजकीय संस्कृतीचा मुद्दाही उपस्थित केला. याबाबत आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. तसेच ठाणे येथील रुग्णालयात एखादी खाट राखून ठेवण्यास सांगणार असल्याचे तटकरे म्हणाले. या वादामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
रत्नागिरीच्या राजकारणात आधीपासूनच प्रभाव असलेल्या या दोन नेत्यांमधील संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय मैत्री, जुने उपकार आणि सत्तेतील समीकरणे यांचा हिशेब आता उघडपणे मांडला जात असून, ‘गटार’ शब्दावरून सुरू झालेले हे राजकीय युद्ध कोकणातील राजकारणात नवी खळबळ निर्माण करत आहे.
