निमित्त
प्रदीप राऊत – response.lokprabha@expressindia.com

हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला नव्हता, बोट सुस्थितीत होती. साधारण ७५० प्रवासी होते. पण भर समुद्रात अचानक वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू झाला आणि बोट कलंडली. रामदास बोटीच्या या दुर्घटनेविषयी रायगडवासी आजही हळहळ व्यक्त करतात. तब्बल ७२ वर्षांनंतर केलेला दस्तावेजीकरणाचा एक आगळा प्रयत्न..

tax fraud case
१७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
pm modi launches infrastructure projects in tamil nadu
मोदींच्या हस्ते तामिळनाडूत १७,३०० कोटींच्या नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन; काँग्रेस आणि द्रमुकवर टीकास्त्र
sudha murty net worth rs 775 crore but hasnt bought new saree in 30 years read behind story
…म्हणून सुधा मूर्तींनी ३० वर्षांत एकही साडी घेतली नाही विकत; कारण एकदा वाचाच

१७ जुलै १९४७. तो दीप अमावास्येचा म्हणजेच गटारीचा दिवस होता. मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांनी अलिबाग, मुरुड या आपल्या गावी जाण्यासाठी भाऊच्या धक्क्यावर गर्दी केली होती. मुंबईत जूनमध्येच पाऊस सुरू होतो. पावसाने मुंबईला दोन दिवस झोडपलं होतं. त्यामुळे आज दिवसभर हवामान कसं असेल, ही चिंता धक्क्यावर जमलेल्यांना होती. तिथे ‘रामदास’ बोट दिमाखात उभी होती. नेहमी मुंबई-गोवा मार्गावर चालणारी ही बोट सणासुदीच्या काळात रेवस, धरमतरला जात असे. एक हजार १७९ फूट लांब, २९ फूट रुंद आणि ४०६ टन वजनाची अशी ही तीन मजली बोट १९३६ मध्ये स्कॉटलॅण्डमध्ये तयार करण्यात आली होती. १९४२च्या युद्धाच्या वेळी  सरकारने ती आपल्याकडे  घेतली होती. आता ती पुन्हा बॉम्बे स्टीम नेव्हिगेशनच्या ताब्यात आली होती. मुंबई किनाऱ्यालगत फेरी करताना रामदासवर एक हजार ५० उतारू आणि हॉटेलचे दहा कर्मचारी तसेच ४२ खलाशी नेण्याची परवानगी असे. नुकतीच बंदर अधिकाऱ्यांकडून तिची पाहणी करण्यात आली होती. बोट चांगल्या स्थितीत असल्याचे प्रमाणपत्रही दिले होते. सरकारी वर्गवारीत ही बोट नवव्या प्रतीची होती. अशा या अजस्र बोटीत प्रवासी मोठय़ा विश्वासाने चढत होते. त्या गर्दीतून वाट काढत बोटीचे कप्तान सावंतवाडीचे दर्यासारंग शेख सुलेमान व चीफ ऑफिसर आदमभाई बोटीत शिरले.

साडे आठ वाजले. बोटीचा कर्णकर्कश भोंगा वाजला. धक्क्यावर असलेल्या खलाशाने धक्क्याला बांधलेले दोरखंड  सोडले. ‘रामदास’ हळूहळू बंदरातून सागरात जाऊ लागली. मार्गात येणाऱ्या छोटय़ा बोटी चटकन बाजूला होत होत्या. त्यावरील खलाशी ‘रामदास’ कडे एक नजर टाकून पुन्हा आपल्या कामाला लागत होते. बोटीने बंदर सोडताच आपल्या माणसांना निरोप द्यायला आलेली माणसं लगबगीने घरी परतू लागली.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड पट्टय़ातील लोकांसाठी ही बोटसेवा सोयीची ठरत असे. रस्तामाग्रे जाण्यापेक्षा या मार्गाने जाणं नेहमीच स्वस्त व वेळ वाचवणारं असल्यामुळे लोक बोटीलाच पसंती देत. आजही लोक बोटीनेच जाणं पसंत करतात. लोक हळूहळू आपल्या जागेवर स्थानापन्न होत होते. सकाळी लवकर घर सोडावं लागल्याने न्याहारी न केलेली माणसं आपापला डबा उघडत होती. ओळखीच्या गाववाल्यांना त्यांची खुशाली विचारत होती, तर काहीजण सकाळी लवकर उठावं लागल्यामुळे अपुरी राहिलेली झोप पूर्ण करण्यासाठी डोळे मिटून बसले होते. ही झोप काळझोप ठरणार आहे याची त्या बिचाऱ्यांना कल्पनाच नव्हती.

बोटीने आठ-दहा मलाचं अंतर कापलं होतं. साडेनऊच्या सुमारास  बोट चालवत असताना कप्तान शेखचं लक्ष आकाशाकडे गेलं. मघाशी निरभ्र असलेलं आकाश आता काळ्या ढगांनी भरून गेलं होतं. वाराही वेगाने वाहू लागला होता. दूरवर पाऊस पडताना दिसत होता. लाटाही उंच उंच होत चालल्या होत्या. वातावरणातील हा बदल पाहून त्यांना शंका आली. त्यांनी आपले सहकारी आदमभाईंचं लक्ष त्याकडे वेधलं. तेही वेगाने वाहणारा वारा, उसळणाऱ्या लाटा आणि आता अचानक सुरू झालेला पावसाचा मारा पाहून हबकून गेले. बोट आता काशाच्या खडकाजवळ आली होती. रेवस अजून किती तरी दूर होतं. सकाळी निघालो तेव्हा हवामान खात्याही धोक्याचा कुठलाच इशारा दिला नव्हता. मग हे वादळ अचानक आलं कुठून असा विचार करत  शेख बोट चालवत होते.

समोर समुद्रात मोठय़ा लाटा उसळू लागल्या होत्या. बोट पुढून सरळ लाटांवर चढत होती आणि दुसऱ्याच क्षणाला तिची मागची बाजू खाली जात होती. जणू काही सागरी पाळणाच! क्षणात उंच, क्षणात खाली. लोक आपली सीट पकडून जागेवर राहायचा प्रयत्न करत होते. थोडय़ा वेळाने बोट कधी डावीकडे तर कधी उजवीकडे हलू लागली. समुद्राचं पाणी वेगाने उसळत आत येऊ लागलं. ते रोखण्यासाठी उतारूंनी आणि खलाशांनी खिडकीवरची ताडपत्री खाली आणली. आता आत पाणी येणं कमी झालं. निसर्गाचा हा रौद्रावतार पाहून सगळेच घाबरले होते. नेहमी प्रवास करणारी वयस्क मंडळी घाबरलेल्यांना धीर देत होती. पण खरंतरे तेही निसर्गाचं हे रौद्ररूप पाहून थिजून गेले होते. वाऱ्याचा जोर एवढा होता की आता खिडक्यांवरची ताडपत्रीही फाटू लागली. त्यामुळे समुद्राचं पाणी थेट आत येऊन प्रवाशांना भिजवू लागलं. लोक भिजणं टाळण्यासाठी बोटीच्या दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करू लागले. पण बोट आता जोरजोरात हलू लागली होती. काही जण डेकवर जाण्याची धडपड करू लागले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर आता भीती दिसू लागली.

कप्तान शेख व आदमभाई दोघंही उंच लाटांतून बोट पुढे नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. अंगावर येणाऱ्या लाटा, रोरावणारा वारा व कोसळणारा जोरदार पाऊस यामुळे पुढचंही काही दिसणं कठीण होत होतं. अचानक शेखचं लक्ष समोरून वाहत येणाऱ्या तेलाच्या िपपांकडे गेलं. ती तरंगत वाहत येत  होती. त्यांनी िपप टाळण्यासाठी बोट वळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे बोट एका बाजूला कलली. त्यातच भर म्हणजे एक अजस्र लाट बोटीवर आदळली आणि बोट आणखी कलली. घाबरलेले उतारू आपला जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या बाजूला गेले. एकाच बाजूला सारा भार आला. शेखने बोट सावरण्याचा प्रयत्न केला, पण खवळलेल्या समुद्राने एका प्रचंड लाटेचा प्रहार ‘रामदास’वर केला आणि ही  निसर्ग व मानवाची लढाई संपवून टाकली. बोट कलंडली. बोटीत पाणी शिरू लागलं. एकच हल्लकल्लोळ माजला. लोक मोठमोठय़ाने आरडाओरडा करू लागले. रडू लागले. आया आपल्या लेकरांना घट्ट पकडून राहिल्या. पण क्षणात लोक दूरवर फेकले गेले. सारा आसमंत किंकाळ्यांनी भरून गेला. समुद्र खदखदून हसत एकेकाला आपल्या पोटात घेऊ लागला. ज्यांना पोहता येत होतं, त्यांनी समुद्रात उडय़ा टाकल्या. ज्यांना पोहता येत नव्हतं ते लाईफ जॅकेट शोधण्याचा प्रयत्न करू लागले. ज्यांच्या हाती जॅकेट लागले, त्यांनीही खवळलेल्या सागरात उडी घेतली. नेहमी मायेने वागणारा समुद्र आता बेभान झाला होता. एवढय़ावरच त्याचं समाधान झालं नाही. अखेर बोटीचा घास घेत त्याने आपली क्षुधा शांत केली. बोट हळूहळू आत जाऊ लागली.

पण काहींनी समुद्रापुढे हार मानली नाही. ते त्वेषाने पोहत पोहत बोटीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते. हाती जे सापडेल त्याचा आधार घेत पाण्यावर तरंगायचा प्रयत्न करत होते. काही जण मुंबईच्या दिशेने तर काही जण अलिबागच्या रेवस बंदराच्या दिशेने पोहू लागले. अशांपकीच होते एक रेवदंडय़ाचे हरी मढवी. त्यांच्याबरोबर रेवदंडय़ातील त्यांचा एक मित्र होता. बोट बुडाल्यानंतर दोघंही पोहत रेवस बंदराच्या रोखाने निघाले. मढवी पट्टीचे पोहणारे होते. पण त्यांच्या मित्राची मात्र दमछाक होऊ लागली. त्याने मढवींना सांगितलं, की आता माझ्यात काही  शक्ती उरली नाही. मी आता काही वाचत नाही. माझा घरच्यांना नमस्कार सांगा. आणि तो थोडय़ाच वेळात सागरात गुडुप झाला. मढवी मोठय़ा प्रयत्नाने किनाऱ्याला लागले. त्यांचा पुनर्जन्मच झाला होता. त्यावेळी त्यांची पत्नी गर्भवती होती. तिला झालेल्या मुलाचं नाव मढवींनी ‘रामदास’ ठेवलं. या जीवघेण्या प्रसंगात माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या घटना घडत होत्या. या पोहणाऱ्यांत एक होते रेवदंडा हायस्कूलचे शिक्षक आणि रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आर. जी. जोशी. पोहताना त्यांच्या हाती एक लाईफ बेल्ट लागला. त्यांच्याजवळच बुडत असलेला एक माणूस त्यांना दिसला. ताबडतोब आर. जीं.नी तो लाईफ बेल्ट त्या बुडणाऱ्याच्या पोटाखाली सरकावला. अशाही अवस्थेत त्याने जोशींना विचारले, ‘तुमचं कसं?’ जोशी हसत म्हणाले, ‘माझी चिंता करू नका! मला पोहता येतं!’

अन् ते या झुंझार माणसाचे शेवटचे शब्द होते! त्यानंतर जोशी पुन्हा दिसलेच नाहीत.

गो. नी. दांडेकरांनी सांगितलेली ही घटना अनंत देशमुखांनी आपल्या ‘अनन्वय’ या पुस्तकात लिहिली आहे. ना नात्याचा ना गोत्याचा अशा माणसाला आपला जीव अर्पण करून वाचवणाऱ्या जोशींनी सागराला त्या परिस्थितीतही मानवाचा निस्वार्थीपणा दाखवून दिला. कदाचित हे पाहूनच सागर खजील झाला असेल आणि त्याचा राग शांत झाला असेल. थोडय़ा वेळाने समुद्र हळूहळू शांत होऊ लागला.

वातावरण निवळल्यानंतर रेवसहून मासळीने भरलेली गलबतं घेऊन काही कोळी मुंबईकडे विक्रीसाठी निघाले. खरं तर ही गलबतं सकाळीच मुंबईला निघाली होती. परंतु वादळ सुरू झालं, तेव्हा हवामानाचा रागरंग पाहून त्यांनी रेवसला परतण्याचा निर्णय घेतला. आता समुद्र काहीसा शांत झाल्यामुळे सकाळचा वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी ती पाच गलबतं वेगाने मुंबईच्या दिशेने जात होती. पण अचानक त्यांना दूरवर एक निराळंच काहीतरी दिसलं. कित्येक माणसं समुद्रात पोहत होती. नुकतंच वादळ होऊन गेलंय आणि आता एवढी माणसं पोहताना दिसत आहेत. हे त्यांना चमत्कारिकच वाटलं. तेवढय़ात काही मृतदेह तरंगताना दिसू लागले. त्यांनी लगेच ओळखलं. काही तरी विपरीत घडलंय. कुठली तरी बोट बुडलेली दिसतेय. त्यांनी झपाटय़ाने आपली गलबतं पोहणाऱ्यांच्या दिशेने हाकली. ज्याला त्यांनी वाचवलं त्याने रामदासची दुर्घटना सांगितली. आपली मासळी नासू नये म्हणून वादळ शमल्यानंतर लगेच आपल्या बोटी समुद्रात ढकलणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या त्या कोळ्यांनी आपल्या फायद्या-तोटय़ाचा विचार बाजूला सारून गलबतातील हजारो रुपयांची मासळी समुद्रात फेकून दिली आणि त्या जागेत वाचलेल्यांना बसवू लागले. जवळपास ७५ प्रवाशांना या कोळ्यांनी जीवदान दिलं. या बोटी रेवस बंदरात पोहचल्यावर तिथल्या लोकांना रामदास बोट बुडाल्याचं कळलं. बोटीचा कप्तान शेख व आदमभाई हे दोघेही बोटीच्या खिडकीतून बाहेर पडून पोहत रेवसला पोहचले. अलिबागचं तार कार्यालय रेवसपासून एका तासाच्या अंतरावर होतं. मग तेथे माणूस पाठवण्यात आला आणि ही दुर्घटना मुंबई कार्यालयात कळवण्यात आली. तेव्हा रेवस धक्क्यावर कंपनीचे तिकीट मास्तर म्हणून किनरे आणि देशमुख (लेखक प्रा. अनंत देशमुख यांचे वडील) हे दोघे कामावर होते. त्यांनी लगेच तिथे असलेल्या तांडेल, खलाशांना घेऊन बोटी समुद्रात ढकलल्या आणि समुद्रातून पोहत येणाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काहींचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आलं. त्याचवेळी काही उतारूही पोहत पोहत तीनच्या सुमारास ससून डॉकला पोहोचले. तेव्हा या दुर्घटनेची माहिती बंदर खात्याला मिळाली. रेवस, मुंबई दोन्ही ठिकाणी बोट बुडल्याची माहिती जनतेला मिळाली. प्रवाशांचे नातेवाईक मोठमोठय़ाने आकांत करत होते. आपल्या प्रियजनांचा ठावठिकाणा माहीत करून घेण्यासाठी त्यांनी कार्यालयासमोर गर्दी केली होती.

माहिती मिळताच नौदल, पोर्ट ट्रस्ट व व्यापारी जहाजांनी शोधकार्याला सुरुवात केली. दोन दिवस शोधकार्य सुरू होते. बोटीवर जवळपास ७५० उतारू होते त्यापकी सुमारे १५५ लोकांचे प्राण वाचवण्यात यश आलं. तत्कालीन काँग्रेस नेते जे पुढे मंत्री तसेच राज्यपाल झाले ते गणपतराव तपासे तेव्हा जवळच्याच उरण दौऱ्यावर होते. त्यांनीदेखील अलिबागचे नेते प्रभाकर कुंटे आदींना घेऊन आपापल्या परीने बचाव कार्यास सुरुवात केली. अनेकांचे मृतदेह अलिबागच्या आवास, सासवणे, किहीम, वरसोली या गावांच्या किनाऱ्याला लागले होते. पार उरण करंजापर्यंत किनाऱ्यांवर मृतदेह येऊन लागले होते. अशा दुखद प्रसंगातही काही नराधमांनी त्या मृतदेहांच्या अंगावरचे दागिने ओरबाडून आपल्यातील हिडिसतेचं दर्शन घडवलं. माशांनी खाल्लेले आणि पाण्याने फुगलेले मृतदेह अशा काही अवस्थेत होते की त्यांच्यावर ताबडतोब अंत्यसंस्कार केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मग गावकऱ्यांनीच त्यावर अंत्यसंस्कार केले. त्यामुळे कित्येक लोकांना आपल्या प्रिय व्यक्तींचं अंत्यदर्शनही घडू शकलं नाही. बहुतांश उतारू गिरगाव-परळ भागातील होते. त्यावेळी मृतांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी वर्तमानपत्रांनी मदत निधी गोळा केला होता. मुंबईच्या तत्कालीन राज्यपालांनी हजार रुपयांची देणगी या मदत निधीला दिली होती. मुंबईत स्थानिक पुढारी स. का. पाटील, मोरारजी देसाई, मुंबईचे शेरिफ आणि रा. स्व. संघ आदींनी मोलाचं सहकार्य केलं.

नेहमीप्रमाणे मग गावाकडे भुताखेतांच्या गजाली जन्माला आल्या. तेव्हा अनंत देशमुख बागदांडे या गावात राहत होते. ते लिहितात, ‘आमच्या घरापासून जवळच डांबरी रस्त्यालगत एका भागात अंबीचा वास असायचा, असे वारंवार सांगितले जाई. अंबी नावाच्या बाईचा मृतदेह तिथे वाहत आला होता किंवा तिने तिथे शेवटचा श्वास घेतला होता. ती भूत होऊन इतरांना भिडते असा समज निर्माण झाला होता. रामदास बोट बुडाल्यावर रेवस, मांडवा, सासवणे, किहीम, वरसोली, अलिबाग, उरण, करंजा भागात वाहून आलेले मृतदेह सापडले होते. अंबी तशीच आली असावी.’

या दुर्घटनेत वाचलेल्यांमध्ये गिरगावातील एक तरुण होता. तो अलिबागला जायला निघाला होता. तो घराबाहेर पाऊल टाकणार तोच एका स्त्रीची आरोळी ऐकू आली, ‘आवस वाढा बाई आवस’! पूर्वी मुंबईच्या चाळीचाळींतून अमावास्येच्या दिवशी असं ओरडत काही स्त्रिया दारोदारी फिरायच्या आणि लोक त्यांना भिक्षा घालायचे. ही आरोळी ऐकताच त्या तरुणाची आई चमकली. आज अमावास्या आहे हे ती विसरून गेली होती. पण त्या स्त्रीच्या आरोळीने ती गोष्ट तिच्या लक्षात आली. तिने आपल्या मुलाला परत फिरायला सांगितलं. आज अमावास्या आहे, तू जाऊ नकोस असं त्याला निक्षून सांगितलं. आईच्या अंधश्रद्धेला बोल लावीत तो चरफडत घरी राहिला. पण संध्याकाळी रेडिओवर जेव्हा त्याने रामदास बोट बुडाल्याची बातमी ऐकली, तेव्हा त्याने आईचे पायच धरले. तिची अंधश्रद्धा त्याला अशी फायदेशीर ठरली होती!

दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी कमोडोर मिल्स यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली. बी. एस. एन कंपनी पुढे सिंदिया कंपनीत विलीन करण्यात आली. बोटीवर वायरलेस यंत्रणा नसल्याचं सिद्ध झालं होतं. परिणामी पुढे प्रवासी बोटींवर दूरसंचार उपकरणे दिसू लागली. तसेच नारळी पौर्णिमेपर्यंत मच्छीमारी बंदीचा कायदाही सरकारने केला. आजतागायत जूनच्या पहिल्या आठवडय़ात रेवस मांडव्याच्या बोटी बंद ठेवल्या जातात. पावसाळा संपता संपता त्या पुन्हा चालू होतात. या अवधीत फक्त उरणच्या मोरा बंदराला जाणाऱ्या बोटी सुरू असतात. मग अलिबागकर बोटीने मोरा बंदरात जातात. तेथून बस, रिक्षा पकडून करंजाला जातात. मग तेथून बोटीने १०-१५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रेवसला पोहोचतात. पावसाळ्यात रायगडवासीयांचा असाच द्राविडी प्राणायाम सुरू असतो. तरीही त्यांना पनवेलमाग्रे रस्त्याने अलिबागला जाण्यापेक्षा हाच मार्ग सोयीस्कर वाटतो.

१९२७ ला ‘जयंती’ आणि ‘संत तुकाराम’ या बोटी बुडाल्या. ‘संत तुकाराम’ बोट बुडाली तेव्हा कवी माधव यांनी (माधव केशव काटदरे) यांनी एक कविता लिहिली ‘संत तुकाराम’. कदाचित कस्टम ऑफिसरच्या नोकरीतून सतत सागराशी असलेल्या संबंधांमुळे त्यांच्या मनाला ही दुर्घटना भिडली असावी. ‘रामदास’ बोट बुडाल्यानंतर त्यावर त्या वेळी एखादी कविता लिहिली गेल्याचं ऐकिवात नाही. त्या वेळच्या ‘मौज’ साप्ताहिकातही रामदासच्या जलसमाधीवर लिहिलं गेलं. या भीषण दुर्घटनेचा वेध घेण्याचा पहिला मान सागरी जीवनाला वाहिलेलं पहिलं मराठी मासिक ‘दर्यावर्दी’ला जातो. प्रख्यात चित्रकार मुळगावकर आणि दलाल हे दोघे या अंकाचं मुखपृष्ठ तयार करीत असत. समुद्रात बुडत असलेली रामदास बोट, आक्रोश करणारी माता आणि तिच्या कुशीत एक भयकंपित झालेलं छोटं मूल असं चित्र मुळगावकरांनी ‘दर्यावर्दी’च्या ऑगस्ट १९४७ च्या अंकासाठी तयार केलं होतं. दोन अंकांतील लेखांत संपादकांनी त्या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईत राहणाऱ्या पण रेवसपासून काही अंतरावर असलेल्या धोकवडे गावात बंगला असलेल्या सुप्रसिद्ध लेखक गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या ‘मुंगीचं महाभारत’ या आत्मचरित्रात ‘रामदास’  बोटीबद्दल माहिती दिली आहे. त्यांचे वडील हे इंडियन को-ऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे म्हणजेच ‘माझी आगबोट कंपनी’चे संचालक होते. ही कंपनी अगदी डबघाईला आली होती. या कंपनीच्या बोटी जयगड, पूर्णगड, रत्नागिरी, जैतापूर, विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ला, गोवा इ. ठिकाणी जात. दाभोळपर्यंत जाणारी ‘दाभोळ लाइन, ‘वेंगुल्र्यापर्यंत जाणारी ‘वेंगुर्ला लाइन’, तर गोव्याला जाणारी ‘गोवा लाइन’ असे भिन्न मार्ग असायचे. रेवस, धरमतरकरिता ‘हार्बर लाइन’ असायची. या पट्टय़ावर शोभना बोट वाहतूक करीत असे. तर ‘सेंट अ‍ॅन्थनी, चंद्रावती, चंपावती, रोहिदास या तुलनेने मोठय़ा बोटी कोकणात वाहतूक करीत. ‘साबरमती’सारखी त्याहून मोठी आगबोट कारवार मार्गावर चालवली जात असे. जुन्या काळात म्हणजे १९३० ते १९५० च्या दरम्यान करंजा, उरण, धरमतर, अलिबाग, रेवदंडा अशी बंदरे असायची. पुढे हार्बर लाइनवर फक्त रेवस आणि धरमतर ही बंदरे राहिली. हैदराबादच्या वामनराव नाईक या लोकमान्य टिळकांच्या  चाहत्याने पसे दिल्यावर कोकण लाइनसाठी दोन बोटी खरेदी करण्यात आल्या. दोन बोटींपकी िहदू प्रवाशांना आकíषत करण्यासाठी एकीचं नाव ‘रामदास’ ठेवण्यात आलं. आणि गोव्याच्या ख्रिश्चन लोकांना खूश करण्यासाठी दुसरीचं नाव ‘सेंट अँथनी’ असं ठेवण्यात आलं. ‘रामदास’ बोट पहिल्या कोकणच्या सफरीवर निघाली तेव्हा तिच्यावर सगळे बोट कंपनीचे संचालक होते. गंगाधर गाडगीळही वडिलांबरोबर त्या वेळी बोटीवर होते. रत्नागिरीला बोट पोहोचल्यावर एक समारंभ करण्यात आला. त्या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते स्वातंत्र्यवीर सावरकर. ते त्या वेळी रत्नागिरीला स्थानबद्ध होते. या वेळी त्यांनी भाषण केलं. गंगाधर गाडगीळ लिहितात, ‘त्यांच्या भाषणातला एक उल्लेख मला आठवतो. ते म्हणाले होते, ‘या बोटीचं नाव रामदास ठेवलं आहे. चांगली गोष्ट आहे. पण रामदास हे नाव ठेवल्यामुळे ही बोट बुडायची नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आणि या बोटीचं नाव सतान ठेवलं म्हणून ती बुडेल असंही मानण्याचं कारण नाही.’ सावरकरांच्या तोंडातून भविष्यवाणीच उमटली असं म्हणावं लागेल!

गाडगीळ पुढे लिहितात, ‘रामदास बोट बुडाली तेव्हा सावरकरांचे ते शब्द मला आठवले. या बाबतीत आणखी एक गमतीदार गोष्ट मला आठवते. रामदास बोट बुडाली तेव्हा एक ख्रिश्चन माणूस मला म्हणाला, पाहा! तुकाराम, रामदास अशी संतांची नावं ज्या बोटींना दिली, त्या बुडाल्या. पण आमच्या सेंट झेवियर आणि सेंट अँथनी या संतांची नावं ज्या बोटींना दिली, त्यांना काहीच झालं नाही.’

गाडगीळांनी रामदासच्या दुर्घटनेवर ‘बोट बुडाली’ ही कथा लिहिली आहे. परंतु कथेत मात्र ‘रामदास’चा कुठेच उल्लेख नाही. बोट बुडाल्यानंतरची परिस्थिती त्यांनी कथेत आपल्या समर्थ लेखणीने अक्षरश नजरेसमोर उभी केली आहे. एखादी तरंगणारी वस्तू पाहिल्यावर ती पकडण्यासाठी पडलेली लोकांची झुंबड, त्याही स्थितीत एखाद्या बलवानाने ती  हिसकावून घेण्यासाठी केलेला प्रयत्न, कोणी आपल्याजवळ येऊन आपल्याला मिळालेल्या फळकुटाच्या आधाराचा वाटेकरी होऊ नये म्हणून त्याची चाललेली धडपड याचं प्रभावी चित्रण गाडगिळांनी कथेत केलं आहे. ‘आणि तरी शेदीडशे मुंडकी पाण्यावर बुचासारखी तरंगत होती. काही फळकुटांना धरून, काही पिशव्यांना बिलगून आणि काही नुसतीच’ हे वर्णन वाचताना मनाचा थरकाप होतो.

आचार्य अत्रे यांनीदेखील या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर कथा लिहिली. त्याचप्रमाणे आपल्या ‘कवडीचुंबक’ या नाटकातही या दुर्घटनेचा उपयोग केल्याचं ‘कऱ्हेचं पाणी’ या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या ‘कवडीचुंबक’ या विनोदी नाटकात पंपूशेट या कवडीचुंबक माणसाची कथा आहे. तो आपली मुलगी गुलाबसोबत रामदास बोटीने प्रवास करत असतो. प्रचंड वादळ होऊन बोट बुडू लागली असता, केशर हा तरुण खवळलेल्या समुद्रात उडी मारून पंपूशेट आणि गुलाब यांना पाठीवर घेऊन पोहत पोहत किनाऱ्यावर आणून सोडतो. त्याच वेळी गुलाब केशरच्या प्रेमपाशात अडकते. (कऱ्हेचं पाणी : खंड चार) गुलाब केशरला म्हणते, ‘रामदास बोट बुडत असताना माझे आणि बाबांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतच्या प्राणांची पर्वा न करता खवळलेल्या समुद्रात तुम्ही बेधडक उडी मारली आणि आम्हा दोघांना आपल्या पाठीवर घेऊन पोहत पोहत किनाऱ्यावर नेऊन पोहोचवलंत.’ (कवडीचुंबक) साहित्यिक अनंत देशमुखांचं बालपण अलिबागमध्ये गेलं. त्यांनीही या दुर्घटनेबद्दल आपल्या ‘गतकाळ’ आणि ‘अनन्वय’ या पुस्तकांमध्ये लिहिलं आहे. असं लिखाण घटनेचा इतिहास समजण्यासाठी उपयोगी पडतं. अन्यथा एकाच घटनेबद्दल निरनिराळी माहिती ऐकायला मिळते. ‘रामदास’ बोट किती वाजता मुंबईहून सुटली त्याबद्दलही कोणी सकाळी सात, तर कोणी आठ, तर कोणी चक्क दहाची वेळ लिहिली आहे. ज्या दिवशी बोट बुडाली त्या दिवशी बोट सुटताना हवामान कसं होतं याबद्दलही उलटसुलट वाचायला मिळतं. कोणी लिहिलंय, त्या दिवशी हवामान चांगलं होतं. तर काहींनी लिहिलंय, त्या दिवशी हवामान इतकं वाईट होतं की कप्तान शेख बोट चालविण्याबाबत साशंक होता. मग प्रवाशांनीच त्याला धीर दिला. त्या वेळी हवामानशास्त्र प्रगत नव्हतं. आता जसजसा वादळांचा अभ्यास होत आहे, त्यावरून वादळ केव्हा, कुठे असेल याचा अंदाज बांधला जाऊ शकतो आणि तिथे खरोखरच वादळ येतं. पण वादळापूर्वी तिथे अशी काही शांतता असते की कुणीही हवामान खात्याची त्यांच्या भाकिताबद्दल थट्टा उडवेल. वर उल्लेख केलेले नंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री झालेले अलिबागचेच रहिवासी प्रभाकर कुंटे यांनी ‘माझे जीवन राजकारण’ हे आत्मचरित्र लिहिलं. पण त्यात कुठेही या दुर्घटनेबद्दल लिहिलेलं आढळलं नाही. साऱ्या कुलाबा (आताचा रायगड) जिल्ह्य़ाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेबद्दल त्यांनी का लिहिलं नाही, हे अनाकलनीय आहे. कदाचित बोट बुडाल्याच्या दुसऱ्याच महिन्यात भारत स्वतंत्र झाला आणि फाळणीच्या वेळी जे हत्याकांड झालं, त्यामुळे या घटनेकडे जेवढं द्यावं तेवढं लक्ष दिलं गेलं नसेल. या हत्याकांडामुळे कदाचित बुडालेल्यांच्या नातेवाईकांना आणि वाचलेल्यांना योग्य ती आíथक मदतही मिळाली नसेल. दुर्दैवाचे दशावतार म्हणतात ते याला!

या दुर्घटनेतून वाचलेले भूषण विश्वनाथ ऊर्फ बारक्याशेठ मुकादम यांचं नुकतंच (१८ मे २०१९) वयाच्या ८४ व्या वर्षी, वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या बाराव्या वर्षी ते रामदास बोटीतून प्रवास करत होते. बोट बुडाल्यानंतर ते पोहत पोहत बंदराच्या दिशेने निघाले होते. सुदैवाने बचावकार्यासाठी निघालेल्या एका बोटीचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि त्यांना बोटीवर घेतलं गेलं. त्यांच्या निधनाने या दुर्घटनेशी संबंध असलेला कदाचित हा शेवटचा असलेला हा दुवा निखळला. ‘संत तुकाराम’ बोट बुडाली तेव्हा त्यावर कवी माधव यांनी कविता लिहिली होती.

‘सिंधुतळी बसले आजवरि जाऊनि जे काही,
बाह्य़ जगी शब्द तयाचा कधि उठला नाही,
संत तुकाराम बुडाली परंतु ज्या ठायी,
शब्द अजूनि उठती तेथून ‘विठ्ठल रखुमाई’

वीस वर्षांनंतर ‘रामदास’ही बुडाली. आज या घटनेला अनेक वर्षे झाली, पण अजूनही नीट कान देऊन ऐकलं तर बोटीतील त्या प्रवाशांच्या जिवाच्या आकांताने उठलेल्या किंकाळ्या ऐकू येण्याचा संभव जास्त आहे!

संदर्भ :
एका मुंगीचं महाभारत : गंगाधर गाडगीळ
गुणाकार (कथासंग्रह) : गंगाधर गाडगीळ
अनन्वय : अनंत देशमुख
गतकाळ : अनंत देशमुख
कऱ्हेचं पाणी, खंड ४ : आचार्य अत्रे
कवडीचुंबक : आचार्य अत्रे
संत तुकाराम : कवी माधव
सौजन्य – लोकप्रभा