Ramesh Chennithala On Chandrapur Mayor Politics : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीनंतर महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी केली. मात्र, यामध्ये सर्वाधिक चर्चा चंद्रपूर महापालिकेची झाली. गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. पण तरीही भाजपाने ठाकरे गटाच्या पाठिंब्याने सत्तास्थापन करत आपला महापौर बसवला.

सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असतानाही काँग्रेसला सत्तास्थापनेपासून दूर राहावं लागल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. दरम्यान, चंद्रपूर महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाने भाजपाला पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडींवर आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सूचक भाष्य केलं आहे.’चंद्रपूरचा बदला आम्ही परभणीत घेतला नाही’, असं रमेश चेन्नीथला यांनी अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे.

रमेश चेन्निथला काय म्हणाले?

“चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदाच्या पार्श्वभूमीवर ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्यावर आज झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. चंद्रपूर महापालिकेत आमच्याकडे २७ चं संख्याबळ होतं. पण तरीही आमच्याकडे बहुमत नव्हतं. बहुमत नसलं तरी आमच्या पक्षाने चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत चांगलं यश मिळवलं. मात्र, झालं असं की शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या ८ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. त्यामुळे चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत आम्हाला अपयश आलं. मात्र, दुसरीकडे परभणीत आम्ही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाला पाठिंबा दिला”, असं रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे.

चंद्रपूरमध्ये नेमकं काय घडलं?

चंद्रपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. भारतीय जनता पक्षाने शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीने महापालिकेवर सत्तास्थापन केली. यादरम्यान महापौरपद प्रत्येकी सव्वा सव्वा वर्ष विभागून घेण्याचा लेखी करारही दोन्ही पक्षांमध्ये झाला. त्यानुसार, भाजपाच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी अवघ्या एका मताने निवड झाली, तर उपमहापौर पदी ठाकरे सेनेचे प्रशांत दानव ईश्वर चिठ्ठीने विजयी झाले. चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला होता.

या निवडणुकीत ६६ पैकी २७ जागा जिंकून काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यापाठोपाठ भाजपाने २३, ठाकरे गटाने सहा जागा वंचित बहुजन आघाडी व अपक्षांनी प्रत्येकी दोन आणि शिंदेसेना, बसपा, एमआयएमने प्रत्येकी एक जागा आपल्या पदरात पाडून घेतली होती. पालिकेत बहुमताने सत्तास्थापन करण्यासाठी भाजपाला ११ तर काँग्रेसला अवघ्या सात नगरसेवकांचा पाठिंबा हवा होता. तेव्हापासून महापौर व उपमहापौर कोण असणार याची चर्चा सर्वत्र सुरू होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसवर खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे पराभवाची नामुष्की ओढवली.