रायगड लोकसभा मतदारसंघात शेकापचे उमेदवार रमेश कदम यांच्यामुळे चुरस निर्माण झाली असली तरी उत्तर रत्नागिरीत त्यांचे लक्ष मनसे, रिपाइं आणि मराठा समाजाच्या व्होटबँकेपुरते मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात त्यांच्या उमेदवारीचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या अनंत गीते यांनाच बसण्याचे स्पष्ट होत आहे. चिपळूणचे नेते रमेश कदम यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत शेकापच्या तिकिटावर लोकसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. अर्थात या राजकीय हालचालीमागे तटकरे यांचीच छुपी भूमिका आहे आणि त्यातही उत्तर रत्नागिरीतील तटकरेंविरोधी संभाव्य मतदान शिवसेनेला अनुकूल ठरण्याची चिन्हे असल्याने रमेश कदम यांना ती मते खाण्यासाठीच िरगणात उतरवले गेले, असे मत राजकीय निरीक्षकांत व्यक्त होत होते. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या चिपळूण विधानसभा मतदारसंघावर नजर ठेवून असलेल्या रमेश कदम यांना या वेळी उमेदवारीसाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व स्थानिक नेते शेखर निकम यांच्याकडून तगडे आव्हान निर्माण झाले आहे. साहजिकच गेल्या वेळी पक्षांतर्गत मतभेदामुळे पराभवाला सामोरे गेलेल्या रमेश कदम यांची यापुढील वाटचाल त्यांचे राजकीय आस्तित्व सिद्ध करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी घेतलेली उडी त्याच आस्तित्वाच्या लढाईचा भाग ठरला आहे.
या निवडणुकीत ते विजयश्रीच्या कितपत जवळ जातील, यापेक्षा किती आणि कोणाची मते खातील, याकडे सर्वाचे लक्ष आहे. अर्थात राष्ट्रवादीचे जुने निष्ठावंत कार्यकत्रे असल्याने रमेश कदम यांचे लक्ष सर्वप्रथम स्वत:च्या व्होटबँकेवरच राहणार असले तरी अनंत गीते यांच्या व्होटबँकेतील अस्थिर घटकांमध्ये संपर्क वाढवण्याची मोहीम राबवण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे रामदास कदम यांनी सामाजिक मतभेदांचा आधार घेत अनंत गीते यांच्या प्रचारास नकार दिल्याने रमेश कदम यांना आणखी पाठबळ मिळाले आहे. शिवसेनेत प्रस्थापित मराठा समाजाचे वर्चस्व असताना रामदास कदम यांची ही जाहीर सामाजिक भूमिका निवडणुकीतील एकमेव मराठा उमेदवार रमेश कदम यांच्यासाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे आणि तीच अनंत गीते यांच्यासाठी उत्तर रत्नागिरीत धोकादायक ठरणार आहे.
रमेश कदम यांचे सध्या उत्तर रत्नागिरीतील तालुक्यांचे धावते दौरे सुरू आहेत. त्यातही त्यांचे लक्ष प्रामुख्याने गीतेविरोधी असंतुष्ट घटकांवरच प्रामुख्याने असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी या मतदारसंघात शेकाप, रिपाइंच्या साथीने शिवसेनेने येथे विजयश्री खेचली होती. आता रायगडमध्ये शेकापने त्यांना दूर केले आहेच, पण उत्तर रत्नागिरीतही रिपाई, मनसेच्या आतापर्यंत शिवसेनेस अनुकूल असलेल्या भूमिकाही अस्थिरतेच्या वाटेवर आहेत. विशेष म्हणजे शेकापचे मातब्बर नेते जयंत पाटील यांच्या साथीने ते रायगडात तटकरेंविरोधात ज्या रीतीने राळ उठवत आहेत, त्या जहाल भूमिकेमुळे पक्षाची संभाव्य विजयी प्रतिमा उभी करण्यात त्यांना यश येत असल्याचेच स्पष्ट झाले आहे. त्यातून अर्थात शेकापचीच व्होटबँक एकवटून त्याचा फटकाही गीते यांनाच प्रामुख्याने बसण्याचे संकेत आहेत. मात्र रमेश कदम यांचे उत्तर रत्नागिरीतील प्रचाराचे मवाळ धोरण पाहता ते या विभागात वातावरणनिर्मिती करण्यात अद्यापही अपयशी ठरल्याचेच चित्र आहे. मात्र येथील मराठा समाजाची सत्ताकेंद्रे लक्षात घेता कदम यांची संपर्क यंत्रणा त्याच दिशेने सक्रिय होतील, असा अंदाज राजकीय निरीक्षकांत व्यक्त होत आहे.