Ramesh Mhatre Case: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली. पण, म्हात्रे यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध करताना माणुसकीच्या दृष्टीने एक रुग्ण म्हणून त्यांना उपचार दिले जात असल्याचे सांगितले, त्यांची प्रकृती ठिक झाल्यानंतर त्यांनी डिस्चार्ज दिला जाईल, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.
ठाणे रुग्णालयातील डॉक्टरांनी काय प्रतिक्रिया दिली?
रमेश म्हात्रे यांच्यावर सुरु असणाऱ्या उपचारांबाबत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा वरिष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. धीरज एस. महांगडे यांनी माध्यमांना माहिती दिली. “घडलेल्या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. पण, एक रुग्ण म्हणून, माणसुकीच्या दृष्टीकोनातून आम्ही त्यांच्यावर उपचार करत आहोत. त्यांची प्रकृती ठिक झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. त्यांना एकच मूत्रपिंड आहे, तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशावेळी ब्रेनस्ट्रोकचा धोका असतो, उलट्या देखील झाल्या आहेत, त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर डिस्चार्ज दिला जाईल”, असेही महांगडे यांनी स्पष्ट केले.
माणुसकीच्या दृष्टीकोनातून उपचार
“विनाकारण कोणालाही आम्ही दाखल करुन घेत नाही, त्यांना खरचं त्रास होत असल्याने उपचार सुरु आहेत. त्यांच्या आरोग्याला काही बाधा होऊ नये आणि एक रुग्ण आपल्याकडे उपचारासाठी आला असताना माणसुकीच्या दृष्टीकोनातून तसेच, वैद्यकीय क्षेत्राचे कर्तव्य म्हणून आम्ही जबाबदारी पार पाडत आहोत, दरम्यान, घडलेल्या घटनेचा निषेधच आहे”, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत. आयएमएच्या देखील आम्ही संपर्कात आहोत आणि मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी देखील अर्ज दिल्याची माहिती महांगडे यांनी माध्यमांना माहिती दिली.
डॉक्टरांकडून निषेध
दरम्यान, एकीकडे डॉक्टरांकडून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असतानाच, दुसरीकडे त्याच रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करत रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली.
