Rameshwar Gavane Suicide News: मुळचे बीडचे असलेले आणि अनेक नामांकित वृत्तसंस्थेमध्ये काम केलेल्या पत्रकार रामेश्वर गव्हाणे यांनी कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या केली. फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर रामेश्वर यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. शुक्रवारी दुपारी फेसबुकवर एक दीर्घ पोस्ट शेअर करत त्यांनी कौटुंबिक कलह आणि त्यातून होणाऱ्या मानसिक त्रासाचा पाढा वाचला. या पोस्टनंतर अनेकांनी रामेश्वर यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गव्हाणे यांनी टोकाचा निर्णय घेतला होता.
रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या पोस्टमध्ये पत्नी आणि काही नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती माझा प्रचंड मानसिक छळ करत आहे”, असा उल्लेख गव्हाणे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला.
बीडमधील अंबाजोगाई येथील एका नर्सिंग होममधून पत्नीने गरोदर असल्याचे खोटे रिपोर्ट मिळवले असून त्याद्वारे माझ्याकडून पैसे उकळण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप गव्हाणे यांनी केला.
लग्नानंतर मानसिक छळ
रामेश्वर गव्हाणे यांनी लग्नानंतर पत्नीकडून सातत्याने मानसिक छळ झाल्याचाही आरोप केला. आमच्या लग्नाला दोन वर्ष झाले असून तेव्हापासून माझी सातत्याने फसवणूक सुरू आहे. “मी झोपेत असताना मला घाबरवण्यासाठी अंगाला चिमटे घेणे, माझ्या जेवणात मीठ, चटणी, मसाला जास्त टाकणे, सातत्याने माझा अपमान करणे, शिव्या देणे”, असे प्रकार सुरू असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.
कमेंटमध्ये निर्णय बदलण्याचे आर्जव, पण…
रामेश्वर गव्हाणे यांच्या पोस्टनंतर लगेचच पोस्टखाली अनेकांनी कमेंट करत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. ओळखीच्या मित्रांनी त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण ते फोनला प्रतिसाद देत नसल्याचे कमेंटवरून दिसते. अखेर गव्हाणे यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची बातमी समोर आली.
एका युजरने लिहिले, “रामेश्वर तुझ्या वेदना असह्य असतील परंतु आत्महत्या हा त्यावरील उपाय नाही. तुझ्या मित्रांचे कॉल घे, त्यांच्याशी बोलून बघ.” दुसऱ्या एका युजरने आत्महत्येच्या वृत्ताला दुजोरा देताना म्हटले, “रामेश्वरच्या गावच्या पोलीस पाटलांशी बोलणे झाले. रामेश्वरने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे. अनेक मित्रांनी त्याच्यापर्यंत संपर्क करायचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने तोपर्यंत उशीर झाला होता. आधी विषप्राशन करून नंतर गळफास घेतला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.”
कवितेमधून मांडली व्यथा
रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी कवितेमधून आपली व्यथा मांडली आहे. “केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी,
काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलांनी“, अशा ओळी लिहित ओळखीतल्याच व्यक्तींनी दगाफटका केल्याचे संकेत गव्हाणे यांनी दिले.
सदर वृत्त रामेश्वर गव्हाणे यांच्या फेसबुक पोस्टवर आधारीत असून या प्रकरणी गव्हाणे यांनी ज्यांच्यावर आरोप केले आहेत, त्यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.
