राम मंदिर देणगी अपहारविरोधात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दादर येथे रामरक्षा आंदोलनाला सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी या आंदोलनाची हाक दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस सुरू असल्याने आंदोलनात जनसागर उसळेल की नाही याबाबत शाश्वती नव्हती. मात्र, भरपावसातही छत्र्या अन् रेनकोट घेऊन उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी आज उपस्थिती लावली. महत्त्वाचं म्हणजे भगवा सदरा घालून उद्धव ठाकरेंनीही भरपावसात आज जनतेशी संवाद साधला.
हिंदू भोळा-भाबडा, पण मुर्ख नाही
“जमलेल्या माझ्या तमात हिंदू बंधू, माता आणि भगिनींनो… याच एका वाक्याने बाळासाहेब ठाकरेंनी देशातील तमाम हिंदूंना जागं केलं होतं आणि विखुरलेल्या हिंदूंना एकवटलं होतं. आजही तोच क्षण आपल्या डोळ्यांसमोर आहे. आपण कट्टर, कडवट आणि देशाभिमानी हिंदू आहोत. आपण हिंदू भोळे, भाबडे आहोत. पण मूर्ख नाही आहोत. आपल्या हिंदुत्त्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललो आहे की अब हिंदू माफ नही करेगा”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली.
शिवसेनेइतकं काम कोणीही केलं नाही
“या देशाची सत्ता हाती घेताना श्रीरामाच्या घोषणा दिल्या गेल्या. राम मंदिरासाठी शिवसैनिकांनी जेवढं काम केलं तेवढं मला वाटत नाही दुसऱ्या पक्षाने केलं असेल. शिलापूजन केलं, रथयात्रेत सामिल झाले, अयोध्येत जाऊन कारसेवा केली. अनेक कारसेवकांनी रक्त सांडले, त्यानंतर जे घडलं, जे मुंबई शहराने भोगलं असं क्वचित एखाद्या शहराने भोगलं असेल. तेव्हा बाळासाहेब ठाकरे पाठीशी उभे राहिले होते. हिंदू भयग्रस्त होता, आक्रमित होता, आधार शोधत होता. तेव्हा शिवसेनेचा भगवा हातात दिला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“१२ वर्षे होऊन गेली, आज ज्या साठी आपण मेहनत केली होती ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली. पण त्यानंतर शिवसेनेला संपवण्यासाठी त्यांनी अफजलखानी विडा उचलला. हिंदूत्वाचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात शिवसेनाच निधड्या छातीने प्रश्न विचारू शकते. अयोध्ये तो झांकी है, काशी-मथुरा बाकी है, असं त्यांनी म्हटलं आहे. ही अयोध्येची झांकी असेल तर काशी मथुरा किती लुटतील? भगव्यांचं सरकार आलं असं आपल्याला वाटलं होतं. अटल जी म्हणाले होते की अब हिंदू मार नहीं खाएगा, पण हिंदूंना लुटणारं सरकार बसलं आहे. हे दुर्भाग्य आहे. हे आरोप मी करत नाहीय, हे आरोप अनेकजण करत आहे. शंकराचार्यांनी म्हटलं होतं की केदारनाथमधील सोनं लुटलं आहे. मध्य प्रदेशातील मंत्र्यांनी महाकालची जमीन लुटली आहे. बद्रीनाथमधूनही अपहाराच्या बातम्या येत आहेत”, असेही दाखले उद्धव ठाकरेंनी दिले.
“शिवसेनेनेही राम मंदिरात देणगी दिली होती. चांदीची वीट दिली होती. कुठे गेलं हे सर्व? मला शिसारी एवढ्यासाठी येते की पैसे शौचालयात लपवले जात होते, एवढं यांचं हिंदुत्व घाणेरडं? हिंदुत्वाचा अपमान करताय तुम्ही. तेथील साधूसंत आता म्हणत आहेत की, सगळे चोर लोक तिथे बसले आहेत. साधूसंतापैकी एकाचं वाक्य आहे, जेव्हा आम्ही मंदिरात दर्शनासाठी जातो, तेव्हा आमची लंगोटीही तपासली जाते. साधूसंतांशी असं वागता आणि करोडोंचा माल गपापा करत आहात? जो नवस बोलतो, श्रद्धेने तिथे जातो, फूल ना फुलाची पाकळी तिथे देतो, हे गायब करता, लाज वाटली पाहिजे तुम्हाला हिंदू बोलून घ्यायची”, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
ही पावसात पेटलेली ठिणगी
“हिंदू भीतीग्रस्त होता, कोणालाही हिंमत होत नव्हती की मी हिंदू आहे म्हणायची, तेव्हा शिवसेनाप्रमुख गरजले होते, की गर्व से कहो हम हिंदू है.. ते हिंदुत्व मला पुन्हा सुरू करायचं. हा हिंदू वेडा नाहीय. पावसात चिंब भिजूनही ते रामरक्षा म्हणत आहेत. ही पावसात पेटलेली ठिणगी आहे. रामभक्त कसे आहेत हे राज्यकर्त्यांना हे कळंल नसेल तर मी आठवण करून देतो की प्रभू श्रीरामांबरोबर जी वानरसेना होती, त्यांनी रावणाची सोन्याची लंका जाळून खाक केली होती. आमचा पक्ष चोरला, आमच्याकडचं प्रभू रामाचं धनुष्यबाण चोरलं. पण आज आमच्या हातात हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली होती होती, ती मशाल आहे. तुमच्या अन्यायाची लंका खाक केल्याशिवाय राहणार नाही. तथाकथित भोंदू आहेत, हे आपल्यावर टीका करत आहेत, त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या धमण्यांमध्ये हिंदूंचं रक्त असेल तर आमच्याबरोबर रामरक्षा करण्याकरता या”, असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी दिलं. तसंच, आम्हाला भाजपामुक्त राम पाहिजे. राम सर्वांचा आहे, असंही ते म्हणाले.
