धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर व त्यांच्या चालकाच्या २० वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज (२० जून) न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी तथा माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची निर्दोष सुटका न्यायालयाने केली आहे. या निकालानंतर पद्मसिंह पाटील यांचे पुत्र तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. ‘पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं होतं, पण आज आम्हाला न्याय मिळाला’, असं राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील काय म्हणाले?

“पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या घटनेला आता २० वर्ष झाले आहेत. तेव्हापासून आतापर्यंत या प्रकरणी कायदेशीर गोष्टी सुरू होत्या. न्यायदेवतेवर आमचा आधीपासूनच पूर्ण विश्वास होता. अखेर न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला आहे. मात्र, गेलेले एवढे वर्ष या लोकांचे परत कोण करणार? आज आपण पद्मसिंह पाटील यांची परिस्थिती पाहिली तर गेले अनेक वर्ष त्यांना या गोष्टी सहन कराव्या लागल्या. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाशी पद्मसिंह पाटील यांचा कुठलाही संबंध नसताना त्यांच्याविरोधात राजकीय षडयंत्र रचलं गेलं. आता हळूहळू सर्वच गोष्टी समोर येतील. मात्र, आज आम्हाला समाधान आहे की न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला”, असं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे.

“आज मी पद्मसिंह पाटील यांना सर्व समजून सांगू शकत नाही, किंवा ते त्यांना कळणार नाही. मात्र, ही परिस्थिती कशामुळे उद्धभवली? हे षडयंत्र कोणी आणि कशामुळे रचलं होतं? यामध्ये कोण-कोण प्यादे होते? पद्मसिंह पाटील हे १९९० च्या दरम्यान मुख्यमंत्री होणार होते. तसा त्यांना शब्द दिला होता. मात्र, काही कारणास्तव ते पूर्ण होऊ शकलं नाही. २००९ ला ते खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच ज्या कालावधीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता, बरोबर तेव्हाच काही लोकांनी एक वेगळ्या पद्धतीने पुढाकार घेतला आणि एक षडयंत्र रचलं गेलं. ते आज न्यायालयाच्या माध्यमातून आमच्या लक्षात आलं. आता न्यायालयाची आर्डर आम्हाला उपलब्ध झाल्यानंतर मी त्याबाबत पुन्हा एकदा सविस्तर बोलेन”, असं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे.

पद्मसिंह पाटील निर्दोष सुटल्यानंतर सून अर्चना पाटील यांची भावूक प्रतिक्रिया

पद्मसिंह पाटील यांची निर्दोष सुटका झाल्यानंतर अर्चना पाटील म्हणाल्या, “सत्याचा विजय झाला आहे. गेली २० वर्षे आमच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक तणाव सहन करावा लागला. जेव्हा हे आरोप झाले, तेव्हा माझी मुले खूप लहान होती. बेंबीच्या देठापासून ओरडून आरोप केले म्हणजे ते खरे ठरत नाहीत. ज्या आरोपामुळे आमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले, मुलांच्या मनावर परिणाम झाला, राजकीय नुकसान तर झालेच, पण भयानक मानसिक त्रासही सहन करावा लागला; आज त्याच प्रकरणात सत्याचा विजय झाल्याने मनाला अत्यंत आनंद होत आहे. आमची गेलेली वर्षे आता कधीही भरून निघणार नाहीत. माझ्या सासऱ्यांना आणि संपूर्ण कुटुंबाला खूप मानसिक छळ सहन करावा लागला आहे, पण आज या निकालाने निश्चितच समाधान मिळाले आहे. रडू येतंय, मनात नेमक्या काय भावना आहेत हे शब्दांत सांगता येत नाही. हे असेच होणार होते, कारण आम्ही काहीही चुकीचे केलेले नव्हते.”

“आम्हाला मानसिक त्रास अधिक झाला. माझी मुले लहान असतानाच आम्ही राजकीय दृष्ट्या मोठा संघर्ष केला आहे. आम्हाला मोठा राजकीय आणि मानसिक छळ भोगावा लागला. पद्मसिंह पाटलांचा मुलगा म्हणून राणादादा, मी आणि आमच्या मुलांनी अतिशय त्वेषाने व जोमाने जिल्ह्यात फिरून सतत कष्ट केले. मनात पाठीमागे सतत एक दुःख, चीड आणि त्रास जाणवत होता. प्रत्येक निवडणुकीत विरोधक नेमका हाच जुना मुद्दा काढून आमच्यावर टीका करायचे. पहिल्या निवडणुकीच्या वेळी तर मी हातात मंगळसूत्र घेऊन शपथ घेत प्रचार केला होता. या सगळ्यात मुलांच्या मनावर जो विपरित परिणाम झाला, त्याचे मला आजही खूप वाईट वाटते”, अशी प्रतिक्रिया अर्चना पाटील यांनी दिली.