“माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या…”; जामीन मिळाल्यानंतर नारायण राणेंचं दुसरं ट्विट

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

Rane Tweet
जामीन मिळाल्यानंतर राणेंचं दुसरं ट्विट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. राणे यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता त्यांना रात्री उशीरा जामीन मंजूर करण्यात आला. प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जामीन मंजूर केल्यानंतर राणेंची सुटका झाली. जामीन मिळाल्यानंतर राणे पुन्हा एकदा जन आशिर्वाद यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचं भाजपाने सांगितलं असतानाच आता राणेंनी ट्विटरवरुन कालच्या घडलेल्या प्रकरणासंदर्भात भाष्य केलं आहे.

रात्री उशीरा नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी मध्यरात्रीनंतर म्हणजेच १२ वाजून ३२ मिनिटांनी एक ट्वीट केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी ‘सत्यमेव जयते’ असं लिहिलेला फोटो ट्विट केलेला.

त्यानंतर आता दुपारी अडीचच्या सुमारास राणेंनी ट्विटरवरुन आपल्या समर्थकांचे आभार मानलेत. “कालच्या प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझ्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार,” असं राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांनी धन्यवाद असं म्हणत महाराष्ट्र भाजपा, भाजपा मुख्य अकाऊंटला टॅग केलं आहे. तसेच जन आशिर्वाद यात्रा असा हॅशटॅग वापरुन पुन्हा आपण यात्रेत सहभागी होणार असल्याचे संकेत दिलेत.

नक्की वाचा >> ‘राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा, कितीही हवा भरली तरी…’; ‘सामना’मधून हल्लाबोल

राणेंच्या मुलाचा इशारा…

नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयीचा राजनिती चित्रपटातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये मनोज वाजपेयी एका सभेला संबोधित करताना, “आसमान में थूकने वाले को शायद ये पता नही है की पलट कर थूक उन्ही के चेहरे पर गिरेगी,” असं म्हणताना दिसतो. तसेच पुढे तो, “करारा जवाब मिलेगा,” असंही म्हणतो. या व्हिडीओच्या माध्यमातून नितेश राणेंनी मंगळवारी राज्यामध्ये घडलेल्या नारायण राणे यांच्या अटक आणि सुटका प्रकरणावरुन विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे. रात्री पाऊणच्या सुमारास नितेश यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

चंद्रकांत पाटलांची टोला…

“नारायण राणेंना जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने त्यांच्या बोलण्यावर काही बंधनं आणली असतील. पण राणे पोलिसांच्या तावडीतून बाहेर पडले आहेत. नारायण राणे बुधवारी काहीही भाषण न करता सिंधुदुर्गात फिरले तरी हजारो लोक राणेंना पहायला येतील. माझा राजा, माझा नेता सुरक्षित आहे की नाही पहायला येतील,” असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

“राज्य सरकारने सूडबुद्दीने राणेंना गोवण्याचा प्रयत्न केला. पण कोर्टाने त्यांना थापड मारली. गेल्या २० महिन्यात हे सरकार फक्त थापडा खात आहे. कोणतीही केस हे जिंकू शकत नाहीत. कारण पोलिसांच्या आणि गुंडांच्या बळावर सरकार चालवत आहेत. पण आता हे चालणार नाही. ही अरेरावी संपली आता…तुम्ही सांगितल्यानंतर सगळ्यांनी घऱात बसायचं ती सक्ती संपली,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

“जन आशीर्वाद यात्रा सुरु होईल. घाबरटाप्रमाणे सिंधुदूर्गात लागू केलेली संचारबंदी मागे घ्या, अन्यथा संचारबंदी मोडून जन आशीर्वाद यात्रा जाणार,” असा इशाराच यावेळी चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rane vs shivsena narayan rane thank bjp and supporters after arrest and getting bail in case related to his comment on cm scsg

ताज्या बातम्या