सोलापूर शहर व परिसरात रंगपंचमीचा उत्सव बुधवारी शांतता आणि उत्साही वातावरणात साजरा झाला. काही भागात रंग खेळताना पाण्याचा वापर जाणीवपूर्वक टाळण्यात आला. लष्कर भागातील लोधी गल्लीसह मंगळवार पेठ, गुरूवार पेठ आदी भागातून निघणाऱ्या रंग गाडय़ांच्या मिरवणुका उत्साहात निघाल्या. यात तरूणाईचा उत्साह कायम राहिला. बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक रंगपंचमी खेळताना डॉल्बी सिस्टिमचा मुक्त वापर करून तरूणाई थिरकली.  रंग पंचमीसाठी बहुसंख्य बाजारपेठा बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
सोलापुरात धूलिवंदनाच्या तुलनेने रंगपंचमी मोठय़ा प्रमाणात साजरी करण्याची पूर्वापार परंपरा आहे. रंगपंचमीच्या दिवशी लोधी समाजासह मंगळवार पेठेतील मन्मथेश्वर देवस्थान मंडळ, गुरूवार पेठेतील शंकरलिंग देवस्थान मंडळाने पारंपरिक पध्दतीने रंग गाडय़ांच्या मिरवणुका काढल्या. विविध मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकांमध्ये एकमेकांवर रंगांची बरसात करण्यात आली. काही भागात रंग गाडय़ांच्या मिरवणुकांचे स्वागत करण्यात आले. रस्त्यावर काही मंडळांनी डॉल्बी सिस्टिमचा मुक्त वापर झाला. डॉल्बीवरील संगीताच्या तालावर बेधुंद होऊन नृत्य करीत रंगोत्सवात सहभाग नोंदविला.
अलीकडे रंगपंचमीसाठी रंग खेळताना पाण्याचा वापर टाळून कोरडा रंग खेळण्याची परंपरा सुरू झाली आहे. त्याचे चित्र अनेक भागात दिसून आले. सकाळपासून सर्वत्र गल्लीबोळात, रस्त्यांवर, चाळी, वसाहती आदी सर्वत्र रंग खेळताना उत्साहाचे वातावरण दिसून आले. विविध गल्लीबोळात, चौकात व रस्त्यांवर सार्वजनिक स्वरूपात रंगांचे पिंप सज्ज ठेवून रंग खेळताना तरुणाईने जल्लोष केला. लहान मुले आणि तरुणांचे जथ्थे एकमेकांवर रंग उधळत त्यात चिंब भिजून जाताना आपल्या निखळ मैत्रीचा आनंद लुटताना दिसून आले.काही भागात कोरडय़ा रंगाची उधळण करीत आनंद लुटण्यात आला.रंगपंचमी खेळताना पाण्याचा वापर जपून करताना ‘स्वाइन फ्लू’ च्या साथीला निमंत्रण मिळणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत होती. मात्र काही भागात आजारपणाची पर्वा न करता उत्साह संचारला होता. वृध्दांनीही आपले वय, आजारपण विसरून उत्साहाने रंग खेळून आनंदाचा हा उत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी महिलावर्गही मागे नव्हता. विशेषत तरुणींनी आपल्या सख्यांना-मैत्रिणींना आणि शेजारच्या मंडळींना रंग लावला. रंगपंचमीला तरुणाई बेधुंद होऊन मोटारसायकली उडवत व गोंधळ घालत जातानाचे चित्र पाहावयास मिळाले. त्यात तरूणांबरोबर तरूणींचाही समावेश होता. काही तरूण ‘कपडे फाड’ रंगपंचमी साजरी करताना दिसून आले. त्यामुळे रंग खेळताना रंगाचा बेरंग होण्याचेही प्रकार घडले.
रंगपंचमीनिमित्त शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा बंद होत्या. नव्यापेठेसारख्या मोठी वर्दळ असलेल्या भागात दुपारी रंग खेळल्यानंतर तरूण मुले रस्त्यावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटताना पाहावयास मिळाली. शासकीय-निमशासकीय कार्यालये, बँकांचे कामकाज चालू असले तरी तेथील वर्दळ अत्यल्प होती. खासगी नोकरवर्ग वाजत-गाजत, नाचत आपल्या धन्याच्या घरी जाऊन त्यास मानपान करून रंग लावत होता. त्यापोटी धन्याकडून ‘बक्षिशी’ घेताना नोकरांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता. यंत्रमाग, विडी, गारमेंट, कापड, हॉटेल व इतर छोटय़ा-मोठय़ा उद्योग व्यवसायातील कामगार व नोकरांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.

water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
Successful experiment of pistachio farming in Solapur
सोलापुरात पिस्ता शेतीचा यशस्वी प्रयोग!
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण