पंढरीचा विठूराया रंगला रंगात! रंगी रंगला श्रीरंग..

पंढरपुरात रंगपंचमी उत्साहात साजरी

वारकरी सांप्रदायाचे आद्य स्थान असलेल्या पंढरीच्या सावळ्या विठूरायाने देखील रंगोत्सव साजरा केला. पंढरीचा पांडुरंग म्हणजेच श्रीहरी विठ्ठल हा साक्षात श्रीकृष्णाचा अवतार आहे. रंगपंचमी उत्सव हा श्रीकृष्णाचा आवडता सण असल्याने पंढरपूरमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विठूरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर ” अवघा रंग एक झाला ,रंगी रंगला श्रीरंग ” या अभंगाची प्रचिती आली.

वसंत पंचमीला विठ्ठलाचा विवाह सोहळा संपन्न झाला. तो झाल्यावर देवाला म्हणजेच श्री विठ्ठलाला पांढरा पोशाख घातला जातो. वसंत ऋतू सुरु होतो. या ऋतू मध्ये पांढरा पोशाख परिधान केला म्हणजे उन्हाचा आणि थंडीचा त्रास होत नाही. हा पांढरा पोशाख रंगपंचमी पर्यंत असतो. रंगपंचमीच्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास  विठूरायाला पांढरा शुभ्र पोशाख आणि रुक्मिणीमातेस पांढरी साडी परिधान केली जाते. त्यानंतर पुन्हा एकदा केशरी,गुलाल,बुक्का असे नैसर्गिक रंगाची उधळण केली जाते.

रंगपंचमीला सकाळपासून भाविकांनी मंदिरात दर्शन आणि देवाला रंग लावण्यासाठी गर्दी केली होती. दुपारी चारनंतर परंपरेप्रमाणे विठठलास पांढरा शुभ्र पोशाख डोक्यावर पगडी असा पोशाख  तर रुक्मिणी मातेस पांढरी साडी आणि पारंपारिक अलंकार परिधान केले होते. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी देवाची पूजा केली. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने डफची मिरवणूक नामदेव पायरी येथून निघाली. यंदाच्या वर्षी करोना मुळे रंगांची उधळण न करता आणि परंपरा जोपासत ही डफाची मिरवणूक काढल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

शहरात उत्साहात रंगपंचमी
पंढरपुरात मोठ्या उत्साहत रंगपंचमी साजरी झाली. शहरात अनेक ठिकाणी तरूण मुलं –मुली मुक्तपणे रंगांची उधळण केली.यमाई तलाव येथील सुप्रभात मंडळाने कोरडा आणि नैसर्गिक रंगाचा वापर करून एक वेगळी रंगपंचमी साजरी केली. इथे प्रांताधिकारी सचिन ढोले,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे,गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यासह लहान थोर,सर्व जन गाण्याच्या तालावर आणि शिस्तबद्ध कोरडे रंग खेळल्याची माहिती सुनील उंबरे यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rangpanchami utsav at pandharpur temple scj

ताज्या बातम्या