रावसाहेब दानवेंची कोंडी करण्यासाठी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना दिलेली शिवी लोक विसरलेले नाहीत.

बच्चू कडूंच्या हालचाली

वर्षभरापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘एवढी तूर खरेदी करूनही रडतात साले’, या शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा विसर अनेकांना पडला असेल. पण, त्याची धग अजूनही कायम आहे. दानवेंना पराभूत करण्यासाठी अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून होत असताना कडू यांनीही सकारात्मक संकेत देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दानवे यांच्यासह सरकारची कोंडी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

गेल्या आठवडय़ात मराठवाडय़ातील एका कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आमदार बच्चू कडू गेले होते. त्या वेळी त्यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरला. ‘सरकारमधील अनेक मंत्री बेलगाम वक्तव्ये करतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना दिलेली शिवी लोक विसरलेले नाहीत. त्याचा सूड उगवला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. सरकारच्या धोरणांविषयी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष आहे. दानवे यांच्या विरोधात आपण निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. लोकसभा निवडणूक लढण्याची सध्या आपली मानसिकता नाही, पण शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा हा विषय आहे, त्यामुळे आपण तीही शक्यता तपासून पाहू, त्यावर निश्चितपणे सकारात्मक विचार करू’, असे बच्चू कडू यांनी या वेळी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर हे शेतकरी जीन्स पँट घालून आंदोलन करत असल्याची टीका केली होती. भाजपच्या अनेक नेत्यांनी शेतकरी आंदोलनाला हिणवले होते. पैठणनजीक हमीभावाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला. त्यावर दानवे यांनी ‘गोळ्या छातीवर नव्हे, तर पायावर घालायला हव्या’ असे विधान केले होते. सत्तेच्या मस्तीतून असे शब्द आलेले आहेत. त्यामुळे या सरकारला धडा शिकवायला हवा, अशी शेतकऱ्यांची भावना आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

‘शेतातील कामासाठी जुंपलेला जुना बैल व्यवस्थित एका चाकोरीत काम करतो, नवीन बैल मात्र इकडेतिकडे रेंगाळतो. भाजप सरकारची स्थिती ही नवख्या बैलासारखी आहे. त्यांना सरकार चालवणे अजूनही जमलेले नाही. सरकारने कर्जमाफी दिली, पण शेतकरी आनंदी नाही. भरपूर भोजन उपलब्ध असतानाही पोळी वाढायची आणि भाजीसाठी ताटकळत ठेवायचे, पाणीच द्यायचे नाही, अशी अवस्था काही ठिकाणी दिसते, तेच कर्जमाफीचे झाले आहे. शेतकऱ्यांना देण्याची यांची मनोभूमिकाच नाही’, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

सरकारचा पैसा हा भाजपचाच पैसा आहे, अशा थाटात सरकारमधील लोक वागू-बोलू लागले आहेत. एकपक्षीय राजवट आणि एककल्ली कारभार सुरू आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात कुणाचे ऐकून घेण्याची तयारी तरी होती, पण येथे तेही नाही. शेतकऱ्यांच्या धोरणांबाबत लवचीकताच नाही. शेतकरी कार्यकर्त्यांना संपवण्याचे काम सुरू झाले आहे. आपल्यावरच गेल्या तीन वर्षांमध्ये ३० ते ३५ गुन्हे विनाकारण दाखल करण्यात आले. सरकार सूडबुद्धीने वागत आहे. त्याविषयी रोष आहे. शेतकऱ्यांना शिव्या देण्याची मानसिकता बाळगणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रहार पक्षाने अमरावती, यवतमाळ, अकोला आणि रावसाहेब दानवे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याविषयी हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.

शेतीमालाला हमीभाव, बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बच्चू कडू यांनी राज्यभर दौरे करून आंदोलनाची भूमिका घेतली. त्यामुळे सरकारविरोधी मतप्रवाहाची मोट बांधण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाचा उपयोग होऊ शकेल, अशी चर्चा शेतकरी कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीचा अनुभव घेतला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून २००४ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती, त्या वेळी त्यांना अवघ्या १४ हजार मतांनी पराभव झाला होता. तिहेरी लढतीत बच्चू कडू यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

बच्चू कडू यांच्या प्रहार संघटना आणि प्रहार पक्षातर्फे राज्यातील ग्रामीण भागात संघटनात्मक पातळीवर विस्ताराचे काम सुरू आहे. त्याला मराठवाडय़ातून चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने प्रहारचे पदाधिकारी सध्या उत्साहात आहेत. काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला लक्षणीय यश मिळाल्याने कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे. त्यातूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा विषय समोर आला आहे. बच्चू कडू यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी, अशी गळ कार्यकर्त्यांनी घातली आहे.

शेतकऱ्यांबद्दल भाजपच्या नेत्यांनी केलेली आक्षेपार्ह विधाने, लांबलेली कर्जमाफी, नुकसानभरपाई मिळण्यात होत असलेली दिरंगाई हे विषय ताजे ठेवून त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी सरकारविरोधी गट सक्रिय झाला आहे. बच्चू कडू यांना काही राजकीय पक्षांकडून आमंत्रणेही येत आहेत. पण, प्रहार पक्ष अधिक मजबूत करण्याकडे त्यांचा भर असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या संपाच्या वेळी आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. अनेक नेत्यांना नामोहरम करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्याबद्दलही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, त्यासाठीच आता सरकारला कोंडीत पकडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raosaheb danve bacchu kadu farmers issue

ताज्या बातम्या