जालन्यातील चांदई एक्को गावातील प्रवेशद्वाराला नाव देण्याच्या वादातून जालन्यातील चांदई एक्को गावात १२ मे रोजी दोन गटात राडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल ३०२ गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आणि काही जणांना अटक करण्यात आली. गावातील या राड्याची माहिती मिळताच केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खान राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (१६ मे) चांदई एक्को गावात जाऊन दोन्हीही गटांशी चर्चा करून हा वाद मिटवलाय. यापुढे चांदई एक्को गावात पूर्वीप्रमाणेच शांतता राहणार असून गावात पोलिसांकडून लावण्यात आलेली संचारबंदी हटवण्यात यावी, अशी विनंती पोलीस प्रशासनाला करणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.

रावसाहेब दानवे म्हणाले, “चांदई एक्को या गावात १२ मे रोजी दोन गटात संघर्ष झाला होता. त्यातून दगडफेकीसारखे काही प्रकार घडले. यानंतर दोन्ही गटांवर काही गुन्हे दाखल झाले. त्यामुळे दोन्ही बाजूचे काही लोक तुरुंगात होते. त्यातील काहींची सुटका झाली. गावात १४४ कलम लागू आहे. आमच्या तालुक्यात शांततापूर्ण पद्धतीने आणि एकविचाराने वागणारं कोणतं गाव असेल, तर ते चांदई एक्को गाव आहे. परंतु काही घटना अचानक घडतात. तसाच हा प्रकार आहे.”

“जी घटना घडायला नको होती ती घडली. त्यानंतर मी गावात आलो आणि गावातील दोन्ही गटांच्या प्रत्येक कर्त्या पुरुषांची, वयोवृद्धांची आणि तरुणांची भेट घेतली. तसेच गावात शांततेचं आवाहन केलं. एकदा का हे प्रकरण निवळलं की पुन्हा एकदा गावात पहिल्यासारखं वातावरण निर्माण करू, अशा प्रकारची चर्चा झाली. मी घराघरात गेलो, प्रत्येकाच्या ठिकाणी चहा पिलो, चर्चा केली,” अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.

हेही वाचा : “बाबरी पडली तेव्हा मी सुद्धा तिथे होतो, मुंबईवर संकटे येतील तेव्हा…”; मुख्यमंत्र्यांवर दानवेंचा निशाणा

“आता गावात एकदम शांतता आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही दोन्ही बाजूंनी दिली. मी पोलीस प्रशासनाला विनंती करणार आहे की गावातील कलम १४४ हटवावं. तसेच पूर्वीप्रमाणेच गावाला मुक्त वातावरणात आपआपलं काम करू द्यावं,” असंही दानवेंनी सांगितलं.