शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे उघड दोन गट पडले आहेत. शिंदे यांच्यासोबत एकूण ४० बंडखोर आमदार असून त्यापैकी १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तर शिंदे यांनीदेखील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या निलंबनाला विरोध दर्शविला आहे. या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडी सरकार पडणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. असे असतानाच आता भाजपाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सूचक वक्तव्यं केले आहे. मी आता दोन ते तीन दिवस विरोधी पक्षात राहणार आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. दानवे जालन्यात अन्न आणि औषध प्रशासन विभाग इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. एबीपी माझाने याबाबात वृत्त दिले आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Political Crisis : बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळालं तर ऐतिहासिक गोष्ट – संजय राऊत

“मी केंद्रामध्ये मंत्री आहे. भय्यासाहेब राज्यामध्ये मंत्री आहेत. मला मंत्री होऊन अडीच वर्षे झाली आहेत. मागील १४ वर्षांमध्ये तुम्ही जेजे केलं आणि काही करायचं असेल तर लवकर करुन घ्या. वेळ निघून जात आहे. पुढच्या काळात तुम्हाला संधी हवी असेल, तर त्याचाही विचार आपल्याला करता येईल. पण जिल्ह्यामध्ये अजून बरेच काम बाकी आहे. टोपे साहेब अजून दोन ते तीन दिवस मी विरोधी पक्षात आहे. मी माझी बाजू तुमच्या समोर मांडली आहे,” असे सूचक वक्तव्य दानवे यांनी टोपे यांच्या समोर केले आहे.

हेही वाचा >>> “शेवटी तुम्हाला भाजपाची गुलामी करुनच…”; संजय राऊतांची बंडखोर आमदारांवर आगपाखड

दरम्यान, एकनाथ शिंदे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटानेही प्रतिक्रिया दिली असून आम्हीच शिवसेना आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. आम्ही शिवसेना पक्षातच राहणार असून कोणत्याही पक्षात सामील होण्याचा अद्याप विचार केलेला नाही, असे बंडखोर आमदार म्हणत आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.