टेंभुर्णीत १० वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडकीस आली.

टेंभुर्णी (जि. सोलापूर) येथील अकलूज चौकात असणाऱ्या घरकूल वसाहतीमध्ये एका १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडकीस आली.

पीडित अल्पवयीन मुलगी दि. २१ रोजी रात्री आठ वाजता आपल्या घरासमोर खेळत होती. त्यावेळी संशयित आरोपी सागर जगताप याने पीडित मुलीला घरामागे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या गोष्टीची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारु अशी धमकी त्याने दिली. दरम्यान, पीडित मुलीचे डोके आणि पोट दुखु लागल्याने सोमवारी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. मनीष पांडे यांनी उपचार करुन तिला घरी पाठवले. पुन्हा त्रास झाल्याने बुधवारी पीडित मुलगी प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यानंतर डॉ. पांडे यांना संशय आला. त्यांनी पीडित मुलीला विश्वासात घेत चौकशी केली. त्यावेळी तिने सागर जगताप याने जबरदस्तीने बलात्कार केल्याचे सांगितले. डॉ. पांडे यांनी त्वरीत टेंभुर्णी पोलिसांना याची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी लपून बसलेल्या सागर जगताप याला दोन तासात ताब्यात घेतले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rape on 10 year old girl in tembhurni suspect arrested