राहाता: पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक असलेले दुर्मिळ शृंगी घुबड उंबरी बाळापूर परिसरात जखमी अवस्थेत आढळले. उंबरी येथील पंकज महानुभाव आणि ऋषिकेश महानुभाव या दोघांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या दुर्मिळ पक्षाला जीवदान मिळाले आहे.

दोन दिवसांपूर्वी, सोमवारी सायंकाळी पंकज महानुभाव आणि ऋषिकेश महानुभाव हे आश्‍वी येथून उंबरीच्या दिशेने येत होते. आठवडे बाजार असल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ होती. याच गर्दीत रस्त्याच्या कडेला त्यांना एक मोठा आणि विचित्र पक्षी शांत बसलेला दिसला. गाड्यांच्या आवाजाचा किंवा प्रकाशाचा त्या पक्षावर कोणताही परिणाम होत नव्हता. संशय आल्याने दोघांनी जवळ जाऊन पाहिले असता, तो पक्षी जखमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या पक्षाला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले आणि निलेश वाघमारे यांच्या मदतीने यमाई देवी मंदिराजवळील नवनाथ डोखे यांच्या वस्तीवर सुरक्षित ठेवले. त्यानंतर या घटनेची माहिती योगेश रातडीया यांच्या माध्यमातून वनविभागाला देण्यात आली.

जाणकारांच्या मते हा पक्षी शृंगी घुबड असून तो प्रामुख्याने हिमालयीन पट्टा, पश्चिम बंगाल, काश्मीर तसेच नेपाळ, म्यानमार आणि पाकिस्तानमध्ये आढळतो; मात्र महाराष्ट्रात याचे दर्शन अत्यंत दुर्मिळ मानले जाते. या घुबडाच्या डोक्यावर पिसांचे दोन झुपके शिंगांसारखे दिसत असल्याने याला शृंगी घुबड असे नाव पडले आहे. हा पक्षी प्रामुख्याने घनदाट जंगल, डोंगरांच्या कपारी किंवा निर्जन झाडांच्या ढोलीत राहणे पसंत करतो. महत्त्वाचे म्हणजे उंदीर आणि घुशी हे या पक्षाचे मुख्य खाद्य असल्यामुळे तो निसर्गाचा समतोल राखतोच, शिवाय शेतकऱ्यांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरतो.

दरम्यान ​फेब्रुवारी ते एप्रिल हा या पक्षाचा विणीचा हंगाम असतो. अशा काळात जोडीदाराच्या किंवा अन्नाच्या शोधात हे घुबड या भागात भरकटले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी हे घुबड वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यावर उपचार करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. पंकज महानुभव व ऋषिकेश महानुभव यांनी दाखवलेल्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.