परागीभवनासाठी मानवी वावरावर बंदी

विश्वास पवार, लोकसत्ता

वाई : महाबळेश्वरच्या गिरिशिखराच्या काही भागांत सुपुष्पा किंवा पिचकोडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रजातीला यंदा बहर आला आहे. तब्बल सोळा वर्षांनी हा बहर येतो. दरम्यान या वनस्पतीचे  परागीभवन व्यवस्थित व्हावे यासाठी ज्या भागात ही वनस्पती फुलली आहे, त्या भागातील मानवी वावरावर पुढील दहा दिवसांसाठी वन विभागाकडून बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र त्यानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांना सुपुष्पा बहर अनुभवता येणार आहे.

महाबळेश्वरच्या काही भागांत या वनस्पतीचा आढळ आहे. या वनस्पतीला दर १६ वर्षांनी बहर येतो. जांभळय़ा रंगाच्या या फुलांनी सध्या महाबळेश्वरमधील काही भाग बहरून गेला आहे. या वनस्पतीची पुढची पिढी तयार होण्यासाठी या बहरावेळीच तिची काळजी घेणे गरजेचे असल्याने वन विभागाच्या वतीने हा फुलोरा असलेल्या भागातील पॉईंट सध्या पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. फुलपाखरे आणि मधमाश्यांना त्यांचे हे काम निर्धोकपणे करता यावे यासाठी या  भागातील रस्ते, वाटा बंद करण्यात आल्याचे महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले.

अत्यंत दुर्मीळ..

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात अनेक दुर्मीळ वनस्पती आहेत. त्या प्रत्येक प्रजातीची आपली खास वैशिष्टय़े आहेत. यातलीच कारवीच्या गटातील सुपुष्पा ही वनस्पती अशीच दुर्मीळ. स्थानिक पातळीवर सुपुष्पाशिवाय पिचकोडी नावाने देखील ही वनस्पती ओळखली जाते.

थोडी माहिती.

सुपुष्पा प्रजाती ही कारवी कुळातील. कारवीच्या अनेक प्रजाती सह्याद्रीच्या पर्वतांत आढळतात. या सर्वच प्रजाती त्यांच्या फुले येण्याचा क्रम, रंगसंगती आणि सौंदर्य यासाठी प्रसिद्ध आहेत. यातीलच सुपुष्पाला यंदा सोळा वर्षांनी बहर आला आहे. या वनस्पतीचे महत्त्व लक्षात घेऊन सध्या तिचे चांगले परागीभवन होणे आवश्यक असल्याचे कोल्हापूरच्या मुख्य वन संरक्षक कार्यालयातील डॉ. योगेश फोंडे यांनी सांगितले.