scorecardresearch

दुर्मीळ रुद्राक्षाची साताऱ्यात लागवड

भारतात नेपाळ येथून हॉर्टिकल्चर पद्धतीची रोपे येतात. त्याच्यावर प्रक्रिया व संगोपन करून बेंगलोर येथे त्याची सव्वा ते दीड फुटाची वाढ करण्यात येते.

|| विश्वास पवार

वाई : अतिशय दुर्मीळ असणाऱ्या रुद्राक्ष फळाची लागवड साताऱ्यात यशस्वी झाली आहे. शेतीमध्ये व घराच्या गच्चीवरही या रोपाची लागवड सहा वर्षांपूर्वी केली आणि आता या झाडाला पंचवीस रुद्राक्षाची फळे लागली असून ती पाहण्यासाठी सातारकराची गर्दी होत आहे.

  रुद्राक्ष ही वनस्पती नेपाळ, बाली किंवा भारताच्या हिमाचल प्रदेश, काश्मीर या भागात आढळून येते. फक्त या परिसरात या झाडाची फळे मिळणार अशी समज असताना हा समज खोटा ठरवून साताऱ्यातील देगावकर कुटुंबीयांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

मुळात रुद्राक्ष हे अतिशय दुर्मीळ फळ, याशिवाय या फळाला धार्मिक अधिष्ठान, हिंदूू धर्मात शंकराचे प्रतीक म्हणूनही रुद्राक्षाची स्वतंत्र ओळख तसे औषधी महत्त्वही आहे. भारतात नेपाळ येथून हॉर्टिकल्चर पद्धतीची रोपे येतात. त्याच्यावर प्रक्रिया व संगोपन करून बेंगलोर येथे त्याची सव्वा ते दीड फुटाची वाढ करण्यात येते. मग ती भारतात वेगवेगळय़ा ठिकाणी विक्रीसाठी पाठवली जातात. साताऱ्यात नर्सरी उद्योग करणाऱ्या देगावकर यांना अशी रोपे विक्रीबाबत विचारणा झाली. पण साताऱ्यात ही रोपे कोण घेणार असा सुरुवातीला प्रश्न पडला. सहासात वर्षांपूर्वी सातारकरांनी ही रोपे खरेदी केली. यामध्ये आयुर्वेदिक वनस्पती लागवड करणारे, नक्षत्र वन लागवड करणारे, बांधकाम व्यवसायिक, सोसायटीमध्ये वेगळय़ा प्रकारची झाडे आणि वनस्पती लावणारे सदस्य, शेतकरी, कृषी पर्यटन केंद्र चालक आदींनी ही रोपे खरेदी केली. अनेकांचा शेतीत व जमिनीवर रुद्राक्ष लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला पण त्याला पाहिजे अशी फळ धारणा झाली नाही.

    शरद व विद्या देगावकर यांना वृक्षलागवडीची स्वत:ला आवड असल्यामुळे अनेक वर्षे स्वत: आपल्या इमारतीच्या गच्चीवर अनेक प्रकारचे दुर्मीळ वृक्ष ,तसेच वनस्पती लागवड केली आहे. त्यासाठी त्याला थोडा ‘ग्रीन हाउस टच’ दिला आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांनी या तीन मुखी रुद्राक्ष यांच्या फळाचे झाड आणून लावली. रुद्राक्षाचे झाड पाहण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी भेट दिली आहे. मात्र आता या रुद्राक्षाच्या झाडाला पंचवीस फळे लगडली आहेत. हे रोप लागवड केली त्या वेळी दहा ते बारा इंचाचे होते. मात्र आता ते चांगलेच बहरले असून चार ते साडेचार फुटांच्या उंचीच्या या झाडाला तीन मुखी रुद्राक्ष लगडली आहेत. झाडावरून रुद्राक्षाचे फळ गळून पडल्यानंतर त्याचे साल काढावी लागते तरच आपल्याला रुद्राक्ष पाहायला मिळतो, अशी माहितीही शरद देगावकर यांनी दिली.

सहा वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या झाडाला पहिल्यांदा फक्त दोन फळे लागली होती. या वेळी पंचवीस फळे लागली आहेत. सुरुवातीच्या दोन फळांमध्ये दोन आणि तीन मुखी रुद्राक्ष होते. एक मुखी रुद्राक्ष हा लाखात एक सापडतो. सुकलेलं फळ फोडल्यानंतर त्याच्यातून अखंड रुद्राक्ष मिळतो. गाईच्या तुपात थोडा वेळ ठेवल्यानंतर त्याला चांगले पॉलिश व रंग येतो. रुद्रक्षाला कपडय़ात, किंवा सर्व बाजूंनी सोने, चांदी, तांब्याचे वेष्टन किंवा पिंजरा करावा. त्याला कधीही तारेत ओवण्यासाठी भोक पाडू नये त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होते.

 – शरद देगावकर, सातारा

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rare rudraksha planted in satara akp

ताज्या बातम्या