सातारा : जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार व परिसर आता विविधरंगी फुलांसोबतच इथे आढळणाऱ्या विविध पशू-पक्ष्यांसाठीही प्रसिद्धीस येत आहे. कास पठारावरील कास तलावाच्या परिसरात सांबर प्रजातीचे हरीण आढळून आले आहे. या पठारावर सांबर दिसण्याची ही पहिलीच नोंद असून त्याचे हे दर्शन समृद्ध निसर्गसंपदेची खूण असल्याचे निदर्शक मानले जात आहे.
कास परिसरात हरीण प्रजातीतील चितळ, भेकर, काळवीट आदी प्राणी यापूर्वी दिसल्याच्या नोंदी आहेत. मात्र सांबर दिसल्याची ही पहिलीच नोंद आहे. सांबर हरीण भारतात आढळणारी हरणाची मुख्य जात आहे. भारतात आढळणाऱ्या हरणांमध्ये आकाराने सर्वात मोठे हे हरीण आहे. तपकिरी ते गडद राखाडी रंग असलेल्या सांबरांची खांद्यापर्यंतची उंची साधारणपणे १ ते दीड मीटरपर्यंत भरते. पूर्ण वाढलेल्या नराचे वजन सहजपणे ४०० ते ५०० किलोपर्यंत भरू शकते. याची वर्गवारी हरणांच्या सारंग कुळात होते. या कुळातील हरणांच्या मादींना शिंगे नसतात. नरांची शिंगे भरीव असून दरवर्षी उगवतात व गळतात.
शिंगाना अनेक टोके असतात. सांबरांच्या एका शिंगाला पुढे १ व मागे दोन अशी एकूण तीन टोके असतात. कासवर आढळलेल्या या सांबराला अशाच प्रकारे तीन शिंगे आढळली आहेत. माद्या नेहमी कळप करून राहतात. त्यांचा कळप ८ ते १० जणांचा असतो. नर शक्यतो एकटेच असतात. सांबर शाकाहारी असून ते गवत, पाने, फळे इत्यादी खातात. कास पठारावर सांबर दिसण्याची ही पहिलीच नोंद असून त्याचे हे दर्शन समृद्ध निसर्गसंपदेची खूण असल्याचे निदर्शक मानले जात आहे. कास परिसरात पूर्वापासून सांबर असावेत. बिबटे, रानकुत्री यांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्या संख्येत घट झाली असावी असे अभ्यासकांचे मत आहे.
कास परिसरातील कुसुंबीमुरा, एकीव परिसरात सांबर अनेकदा दिसले असले तरी त्यांची संख्या कमी आहे. त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. – ज्ञानेश्वर आखाडे, ग्रामस्थ, कुसुंबीमुरा (ता जावळी)
कास पठार परिसरात बिबट्या, अस्वल, रानडुक्कर, भेकर, गवे, साळिंदर, रानकुत्रे, खवले मांजर यांसारखे अनेक वन्यजीव आढळले आहेत. सांबराचा आढळ मात्र पहिल्यांदा होत असून त्याचे हे दर्शन समृद्ध निसर्गसंपदेची खूण असल्याचे निदर्शक मानले जात आहे. या सांबरापासूनच अन्य वन्यजीवांच्या संरक्षणासाठी रात्रीची गस्तही सुरू केली आहे. – अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, सातारा</strong>
