निसर्गातील सफाई कामगार, अशी ओळख असलेला आणि जगातून नामशेष होत चाललेल्या अतिशय दुर्मीळ अशा पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचा शोध सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाडजवळ पेठगाव येथे लागला आहे. तेथील एका झाडावर पांढऱ्या पाठीची १७ गिधाडे मुक्कामाला आहेत. चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य संरक्षक संजय ठाकरे यांना ही माहिती मिळताच त्यांनी गिधाडांसाठी रानडुक्कर व मृत गुरांची खानावळ तयार केली आहे. जवळच्या गडचिरोलीनंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्य़ात या गिधाडांची नोंद घेण्यात आली आहे.

या गिधाडांची नोंद गडचिरोली जिल्ह्य़ातील धानोरा तालुक्यातील कुनघाडा, रांगी, तसेच सिरोंचा तालुक्यात घेण्यात आली आहे. या गिधाडाचे शास्त्रीय नाव निओफ्रॉन पर्कनॉप्टेरस असे आहे. आकाराने हे घारीएवढे असून मळकट पांढरे असते. त्याचे डोके पीसविरहित व पिवळे असते. उड्डाणपिसे काळी असतात. पंख लांब आणि टोकदार, तर शेपूट पाचरीसारखे असते. मादी दरवेळी दोन अंडी घालते. ती पांढरी किंवा फिकट विटकरी रंगाची असून त्यावर तांबूस किंवा काळे डाग असतात. याच्या विणीचा हंगाम फेब्रुवारी ते एप्रिल, असा असतो. ही गिधाडे दक्षिण युरोप आणि आफ्रिकेत, तसेच भारतात आसामात आढळतात. गडचिरोलीत तर या गिधाडांची विशिष्ट खानावळच तयार करण्यात आलेली आहे. तेथे या गिधाडांची संख्या बऱ्यापैकी असतांनाही चंद्रपुरात मात्र त्यांची नोंद आजवर नव्हती. गडचिरोलीतील ही गिधाडे चंद्रपूर जिल्ह्य़ातही यावीत, या दृष्टीने दोन वर्षांंपासून प्रयत्न सुरू होते, परंतु यात वनखात्याला सातत्याने अपयश आले. कधी काळी सात बहिणींचे डोंगर परिसरात या गिधाडांची नोंद घेण्यात आली होती, परंतु गेल्या काही वर्षांत तर चंद्रपुरात ती दृष्टीसच पडली नाही.

वैनगंगा नदी पार करून ही गिधाडे चंद्रपूर जिल्ह्य़ात मुक्कामाला, यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू असतांनाच सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपक्षेत्रात उपरी नियतक्षेत्रातील पेठगाव या छोटय़ा खेडय़ात एका झाडावर या गिधाडांची नोंद घेण्यात आलेली आहे. एक दोन नाही, तर तब्बल १७ मोठी गिधाडे या झाडावर मुक्कामाला आहेत. पेठगाव येथे गिधाडे मिळाल्याची माहिती क्षेत्र सहायक कोडापे व राठोड यांनी संजय ठाकरे यांना देताच त्यांनी पेठगावला जाऊन   पाहणी केली तेव्हा नामशेष होणारा हात तो पक्षी दिसल्याने प्रथमदर्शनी आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.