अलिबाग- रसायनी येथील हिरानंदानी फॉरच्युन सिटी येथून दोन टन वजनाच्या अल्यूमिनीयम धातूच्या सेंटरींग प्लेट चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी रसायनी पोलीसा ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीसांनी २४ तासात तपास करून आरोपी टोळी जेरबंद केली आहे.
रसायनी येथील हिरानंदानी फॉरच्यून सिटी येथून २५ एप्रिल २०२६ पहाटे तीनच्या सुमारास दहा ते बारा जणांनी २ टन वजनाच्या अँल्यूमिनीयम धातूच्या साडे सहा लाख रुपये किमतीच्या सेंटरीग प्लेट चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची दखल घेऊन रसायनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी
अभिजीत भुजबळ आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तपास सुरू केला. मुंबई पुणे जुने महामार्गावरील घटनास्थळाचे दोन्ही बाजुकडील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली त्यात संशयीत टेम्पो दिसून आला. त्यानंतर शेडुंग टोल नाका येथे सदर टेम्पोचे सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केले असता त्या ठिकाणी टेम्पोची नंबर प्लेट दिसु नये या पद्धतीने काळी केलेली असल्याचे दिसून आले. टोल नाक्याचे सिस्टीममध्ये दिलेला नंबर देखील चुकीचा दाखवित होता. त्यामुळे तपास अत्यंत क्लिष्ट व गुंतागुतीचा होत होता.
सीसीटीव्ही चे तांत्रीक विश्लेषण व गोपनिय बातमीदार यांचा वापर करून गुन्ह्यात वापरलेल्या टेम्पोचा शोध घेतला असता सदरचा टेम्पो सीबीडी बेलापुर येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सीबीडी बेलापुर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सापळा रचुन शिताफीने टेम्पो व त्यावरील टेम्पोचा चालक यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. चोरीला गेलेला सर्व साडे मुद्देमल पोलीसांनी जप्त केला आहे.
विकास रामपाल वाल्मिकी वय. 26 वर्षे, रा. सीबीडी बेलापुर, आताउल्ला उर्फ यासीन अमजलअली खान, वय. 25 वर्षे, रा. पळस्पे पनवेल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अन्य तीन आरोपींही निष्पन्न झाले आहेत.त्यांचा शोध सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेली वाहनेही पोलीसांनी जप्त केली आहेत.
पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ, सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, उप निरीक्षक मंगेश बाचकर, सहा. फौजदार. लालासाहेब कोळेकर, पोलीस हवालदार नितीन शेडगे, पोलीस शिपाई वैभव होले, गिरीष नगरकर, रविंद्र कुंभार, पोलीस हवालदार हेमंत कोकाटे, सुशांक पिंगळे, सचिन चौरे, हरिश्चंद्र मेहत्रे यांनी तपासात महत्वाची भूमिका बजावली.
