अलिबाग : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला आलेल्या पुरात कर्जत–पेण मार्गावरील एसटी बस अडकल्याची घटना रविवारी (५ जुलै) सारसई येथे घडली. बसमधील आठ प्रवाशांची रसायनी पोलिसांनी धाडसी बचावमोहीम राबवत सुखरूप सुटका केली.
पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने बस अडकून पडली होती.
घटनेची माहिती मिळताच रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पाऊस आणि वाढता पाण्याचा प्रवाह यांची पर्वा न करता पोलिसांनी हेल्प फाउंडेशन, रसायनीच्या सदस्यांच्या सहकार्याने बचावकार्य सुरू केले.
नियोजनबद्ध पद्धतीने बसमधील सर्व आठ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यामध्ये ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेचीही सुखरूप सुटका करण्यात आली. एका पोलीस कर्मचाऱ्याने ज्येष्ठ महिलेला खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून सुरक्षितस्थळी आणल्याने उपस्थितांनी पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केले.
या बचाव मोहिमेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या प्रकृतीची खातरजमा करण्यात आली. सुटका झालेल्या प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी रसायनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. दरम्यान, रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुराचे पाणी असलेल्या रस्ते व पुलांवरून प्रवास टाळावा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने पोलीस अथवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन रसायनी पोलिसांनी केले आहे.
