राज यांच्या बहिणीने घडवून आणली रश्मी आणि उद्धव ठाकरेंची ओळख

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या राजकीय यशामध्ये त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या राजकीय यशामध्ये त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राजकीय प्रवासात उद्धव ठाकरे यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. शिवसेनेची धुरा हाती घेतल्यापासून उद्धव ठाकरे यांनी अनेक कसोटीचे क्षण अनुभवले. नारायण राणे यांचे बंड असो, किंवा मराठीच्या मुद्दावरुन मनसेने सुरु केलेला झंझावात, या सर्व कठीण काळात उद्धव ठाकरे यांना पत्नी रश्मी यांनी खंबीर साथ दिली.

“रश्मी ठाकरे या मूळात शांत स्वभावाच्या आहेत. त्या मितभाषी असल्या तरी निश्चयी आहेत. त्या स्वत:ला नेहमी कामामध्ये गुंतवून ठेवतात” अशी माहिती त्यांचे काका दिलीप श्रृंगारपुरे यांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. रश्मी ठाकरे यांचा जन्म डोंबिवलीत एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. लग्नाआधीचे त्यांचे आडनाव पाटणकर आहे. ८० च्या दशकात मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली. त्यांचे वडिल माधव पाटणकर यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे.

रश्मी ठाकरे यांच्यावर त्यांचे आई-वडिल आणि सासू-सासऱ्यांचा प्रभाव आहे. “रश्मी यांचे आई-वडिल आणि सासू-सासऱ्यांबरोबर दृढ नाते आहे. कौटुंबिक संस्कारांमध्ये मुले घडतात यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच सत्ता आणि लोकप्रियतेची हवा कधी त्यांच्या डोक्यात गेली नाही” असे श्रृंगारपुरे यांनी सांगितले.

१९८७ साली रश्मी ठाकरे एलआयसीमध्ये नोकरीवर रुजू झाल्या. कंत्राटी स्वरुपाची ही नोकरी होती. “एलआयसीमध्ये नोकरी करत असताना त्यांची जयवंती ठाकरे यांच्याबरोबर मैत्री झाली. जयवंती या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची  बहिण आहे. जयवंती यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली. उद्धव ठाकरे त्यावेळी राजकारणात फारसे सक्रीय नव्हते. ते फोटोग्राफी करायचे. त्यांनी एक अॅड एजन्सी सुद्धा सुरु केली होती. या ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत झाले. नंतर १३ डिसेंबर १९८९ रोजी दोघे विवाहबद्ध झाले.” अशी माहिती एका मित्राने दिली.

रश्मी ठाकरे यांचा राजकीय निर्णयांमध्ये किती सहभाग आहे हे ठाऊक नाही. पण शिवसेनेच्या कठीण काळात त्यांनी पक्षाला बांधून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली. आजही शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचा वावर असतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rashmi thackeray behind uddhav thackerays success dmp

Next Story
लोकसभा निवडणूक निकालातून विधानसभेचा वेध
ताज्या बातम्या