Raj Thackeray Emotional Speech : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त शिवसेनेतर्फे षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुफान भाषण केलं. त्यांचं भाषण ऐकताना उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या भावूक झाल्या होत्या.
आज महाराष्ट्र आणि देशात राजकारणाची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. गुलामांचा बाजार मांडला गेला आहे. महाराष्ट्रातले आजचे चित्र पाहिल्यानंतर मला असे वाटते, बाळासाहेब नाहीत ते बरंच आहे”, असे उद्विग्न विधान राज ठाकरे यांनी काढले.
महाराष्ट्रात माणसांचा लिलाव सुरू
राज ठाकरे पुढे म्हणाले, “आजची परिस्थिती पाहून तो माणूस किती व्यथित झाला असता. त्या माणसाला काय त्रास झाला असता. पूर्वी चावडीवर उभे राहून माणसांचे लिलाव चालायचे, आज त्याप्रमाणे महाराष्ट्रात लिलाव सुरू आहेत. आज सर्व जिल्ह्यात हेच सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबरोबर माझे बोलणे झाले. सध्याचे चित्र पाहून शिसारी आली. आज हे चित्र पाहायला माननीय बाळासाहेब नाहीत, यापेक्षा चांगली गोष्ट नाही.”
अन् रश्मी ठाकरे झाल्या भावूक
“बाळासाहेब ठाकरे हे पाहूच शकले नसते. त्यांनी शून्यातून गोष्टी उभ्या केल्या होत्या. बाहेरच्या पक्षात बघा. अनेक लोक असे दिसतील, ज्यांना बाळासाहेबांनीच उभे केले होते. बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. त्यालाही २० वर्ष उलटून गेल्या आहेत.अनेक गोष्टी मलाही उजमल्या, काही गोष्टी उद्धवाही समजल्या असतील. द्या ते सोडून आता”, असं राज ठाकरे म्हणाले. त्यावेळी रश्मी ठाकरे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
“बाळासाहेब ठाकरे या विषयावर मला व्याख्यानच द्यायला आवडेल. त्या माणसाचे सर्व पैलू मला एकदा तुमच्यासमोर मांडायचे आहेत. आपण हत्तीची गोष्ट ऐकली असेल. त्याचे कान, शेपूट, सोंड प्रत्येक गोष्ट वेगळी वाटते. बाळासाहेब ठाकरे असेच होते. प्रत्येकाला ते वेगळे वाटत होते. तो माणूस कसा होता? हे जगाला कळलेच नाही. आम्ही घरातले असून आम्हाला कळले नाही, तर तुम्हाला कुठून कळणार? पण जे होते, ते विलक्षण होते”, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.
