scorecardresearch

‘भारत जोडो यात्रे’मुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मुस्लीम समाज आठवला – नाना पटोले

“सरसंघचालक मोहन भागवतांना आत्ताच इमाम इलियासींची भेट का घ्यावी वाटली?” असा प्रश्न देखील केला आहे.

‘भारत जोडो यात्रे’मुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मुस्लीम समाज आठवला – नाना पटोले

सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल (गुरुवार) ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांची दिल्लीत भेट घेऊन तासभर चर्चा केली. ज्ञानव्यापी मशिद प्रकरण, कर्नाटकमधील हिजाबचा वाद आणि भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे वादग्रस्त विधान या घटनांच्या पार्श्वभूमीवर, मुस्लिमांशी संवादप्रक्रिया कायम ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भेटीतून केल्याचे मानले जाते. तर या भेटीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरएसएस व भाजपावर टीका केली आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री करी दिल्लीवारी लेक झाला कारभारी… – नाना पटोलेंनी साधला निशाणा!

“काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो पदयात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून जाती-धर्मात तेढ निर्माण करुन व्देषाचे राजकारण करणाऱ्या पक्ष, संघटनांचे धाबे दणालेले आहेत. हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून आपले इस्पित साधणाऱ्या भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पायाखालची वाळू या पदयात्रेमुळे सरकली आहे. म्हणूनच आरएसएसला मुस्लीम समाजाची आठवण झाली असून सरसंघचालक मोहन भागवत यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांची दिल्लीतील मशिदीत जाऊन भेट घेतली.” अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे.

भाजपा व आरएसएसच्या ‘भारत तोडो’ला काँग्रेसकडून ‘भारत जोडो’ने उत्तर –

सरसंघचालक मोहन भागवत व इमाम इलियासी यांच्या भेटीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले पुढे म्हणाले की, “कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो पदयात्रा सुरु होऊन १५ दिवस झाले असून, या यात्रेला समाजाच्या सर्वच घटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. देशात सध्या सुरु असलेल्या भाजपा व आरएसएसच्या ‘भारत तोडो’ला काँग्रेसकडून ‘भारत जोडो’ने योग्य उत्तर दिले आहे. देशाची एकता व विविधता अबाधित ठेवणे, लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसची ही पदयात्रा देशभरातून जाणार आहे. सातत्याने हिंदू, मुस्लीम वाद उकरून काढणे, लव्ह जिहाद, मशिदीवरील भोंगे, मदरसे यासारखे मुद्दे उकरून काढून समाजात तणाव वाढवणे व सामाजिक शांतता बिघडवणे हे संघ विचाराच्या पक्षाचे काम सुरु असून याचा फायदा उठवत भाजपा आपले राजकारण करत आहे. याच पदयात्रेत पाच-सहा वर्षाच्या मुस्लीम मुलीने राहुल गांधी यांची भेट घेतली. तर त्यावरही टीकाटीप्पणी करून भाजपाने आपला मुस्लीम द्वेष व्यक्त केला.”

… हेच काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेचे मोठे फलित आहे –

“मुस्लीम समाजाची साधी टोपीही ज्या लोकांना आवडत नाही त्यांना आज मशिदीत जाऊन इमामाची भेट घ्यावी लागते हेच काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेचे मोठे फलित आहे. पण आता वेळ निघून गेली असून भाजपा व आरएसएसने मुस्लीम प्रेमाचा कितीही देखावा केला, तरी मुस्लीम समाज त्यांच्या या बेगडी प्रेमाला बळी पडणार नाही. हा देश सर्वांचा आहे, विविधतेत एकता ही या देशाची ओळख आहे आणि ती जपण्याचे काम काँग्रेस करत आहे.” असेही पटोले म्हणाले.

मुस्लिमांशी संवाद कायम राखण्याचा संघाचा प्रयत्न ; सरसंघचालक मोहन भागवत-इमाम इलियासी भेट

भारत जोडो पदयात्रेसंदर्भात मुंबईत एक बैठक झाली या बैठकीत तुषार गांधी, योगेंद्र यादव, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सहभाग घेतला होता. भारत जोडो यात्रेला त्यांनी पाठिंबा दिला आहे तसेच विविध समविचारी संघटना व पक्ष यांनीही पाठिंबा देत पदयात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे..या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे हेही उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rashtriya swayamsevak sangh remembered muslim society only because of bharat jodo yatra nana patole msr

ताज्या बातम्या