रत्नागिरी : रत्नागिरी ‘जिल्हा परिषदेची पोरं हुशारच!’ या वाक्यावर पुन्हा एकदा यशाची मोहर उमटली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता चौथीच्या गुणवत्ता यादीच्या कट-ऑफने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली आहे. यंदा ग्रामीण विभागाचा गुणवत्ता यादीतील कट-ऑफ २१२ गुण, तर शहरी विभागाचा कट-ऑफ २०६ गुण राहिला. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या स्पर्धेत शहरी विद्यार्थ्यांवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्यासाठी ग्रामीण भागात अधिक तीव्र स्पर्धा असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. दुर्गम वाडी-वस्त्यांवर राहून, मर्यादित साधनसामग्री आणि विविध प्रतिकूल परिस्थितींचा सामना करत विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या या यशामागे दुर्गम आणि वाडी-वस्तीवरील प्राथमिक शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करून देणे, सातत्याने सराव घेणे आणि गुणवत्तेची जिद्द निर्माण करणे, यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित असल्याचे मानले जात आहे.

यंदापासून सुरू झालेल्या इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतही प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय राहिले आहे. पहिल्याच वर्षी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी केलेली ही कामगिरी ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसाठी आश्वासक मानली जात आहे. या यशामुळे आगामी काळात जिल्हा परिषद शाळांमधून अधिक गुणवंत विद्यार्थी घडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मर्यादित साधनसुविधांमध्येही ग्रामीण विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या जोरावर मिळविलेले यश जिल्हा परिषद शाळांबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक दृढ करणारे ठरले आहे. ‘जि. प. शाळांतील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत’, हा विश्वास या निकालामुळे आणखी बळकट झाला आहे. इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे तसेच सातत्याने मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, शिक्षणाधिकारी किरण लोहार तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तेची ही परंपरा आगामी काळातही कायम राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.