रत्नागिरी – प्रजासत्ताक दिनाच्या ७७व्या वर्धापनदिनानिमित्त शहरातील पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पोलीस, एनसीसी, होमगार्ड आदींचे शिस्तबद्ध संचलन, विविध विभागांचे चित्ररथ आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेले दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रम हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत यांनी स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर पालकमंत्र्यांनी संचलनाचे निरीक्षण केले. मुख्यालय पोलीस पथक, पुरुष व महिला पोलीस पथके, गृह रक्षक दल, पोलीस बँड, विविध महाविद्यालये व शाळांचे एनसीसी पथक, स्काऊट-गाईड, विद्यार्थी पोलीस कॅडेट, पोलीस श्वान पथक, अग्निशामन दल आदींनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.

सांस्कृतिक कार्यक्रमांत अविष्कार संस्थेच्या विद्यार्थ्यांची डंबेल कवायत, मेस्त्री हायस्कूलचे राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित सादरीकरण, फाटक हायस्कूलचे लेझीम, तर शिर्के हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी योगासने, लाठीकाठी व तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व गुणवत्ता वाढ’ या विषयावरील चित्ररथ विशेष लक्षवेधी ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा, नासा-इस्रो भेट उपक्रम, स्वच्छ भारत अभियान, हरित महाराष्ट्र आणि डिजिटल साक्षरतेचा संदेश देणाऱ्या या देखाव्यातून प्रगत, वैज्ञानिक आणि आत्मनिर्भर भारताचे दर्शन घडविण्यात आले.