रत्नागिरी : कपात केलेली देयकाची रक्कम परत मिळवून देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्यासह एका कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे सिंचन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार ‘शिवकृपा कन्स्ट्रक्शन’ या नावाने व्यवसाय करतात. मंडणगड तालुक्यातील भोळवली येथे धरण गळती रोखण्यासाठी मातीकामाचे आदेश त्यांना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर दोन देयके अदा झाली; मात्र तिसऱ्या व अंतिम देयकातून ११,३०,८९३ रुपये कपात करण्यात आले होते.
ही रक्कम परत मिळवण्यासाठी तक्रारदारांनी १८ मार्च २०२६ रोजी कार्यकारी अभियंता गणेश हरीदास सलगर यांची भेट घेतली. त्यावेळी सलगर यांनी ३.४० लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी याबाबत २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली.
एसीबीने पडताळणी केल्यानंतर तडजोडीअंती २ लाख रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, सलगर यांनी ही रक्कम कनिष्ठ लिपिक शेखर चंद्रमणी पवार याच्याकडे देण्यास सांगितले. पवाराने लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणात कार्यकारी अभियंता सलगर (वर्ग १) आणि कनिष्ठ लिपिक पवार (वर्ग ३) यांच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव व त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ७०३८३९१०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
