रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या तीन महिन्यांत येथून पहिले विमान उड्डाण करेल, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी केली. भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) यांच्यात झालेल्या सामंजस्य करार कार्यक्रमात ते बोलत होते. रस्ते, रेल्वे आणि विमानसेवेच्या माध्यमातून जिल्ह्याची संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, उद्योग आणि पर्यटनालाही त्यामुळे चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“रत्नागिरी विमानतळ हा केवळ घोषणांचा विषय राहिलेला नाही. आजवर उपस्थित झालेल्या सर्व शंका दूर झाल्या असून, अवघ्या तीन महिन्यांत येथून विमानाचे पहिले उड्डाण होईल,” असे सामंत म्हणाले. जिल्ह्यात कारखानदारी वाढावी आणि नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने विमानतळ उभारणीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यातील बहुतांश काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

विमानतळाच्या उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाचे सहकार्य लाभल्याचे नमूद करताना त्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानले. एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे जात असल्याचे त्यांनी सांगितले. भूसंपादन प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आमदार निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

यावेळी सामंत यांनी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. रत्नागिरीतील एअर स्ट्रिप पाहिल्यानंतर त्यांनी तिचे कौतुक केले होते आणि बारामतीतही अशाच धर्तीची सुविधा असावी, अशी इच्छा व्यक्त केली होती, असे सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीच्या पर्यटन विकासासाठी आगामी काळात पाचतारांकित हॉटेल, झाडावरील रेस्टॉरंट आणि अॅडव्हेंचर पार्क उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी जाहीर केले. रत्नागिरीला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, विमानतळ परिसरात स्थानिक महिला बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे आणि विकासकामांमध्ये राजकारण किंवा अनावश्यक विरोध करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनीही विमानतळामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, पर्यटन वाढविण्यासाठी पाचतारांकित हॉटेलसारख्या दर्जेदार सुविधांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. गोव्याने पर्यटनाच्या बळावर मोठी आर्थिक प्रगती साधली असून, त्याच धर्तीवर रत्नागिरीत अधिकाधिक पर्यटक आकर्षित करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे कपूर यांनी सांगितले.