रत्नागिरी: रत्नागिरीत हवामानाचा खेळ पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. एकीकडे कडक उन्हाने तापमान ३७ अंशांवर पोहोचले, तर दुसरीकडे अवेळी पावसाने हापूस आणि काजू बागायतदारांचे मोठे नुकसान सुरू केले आहे. कधी डझनाला १५०० ते २००० रुपयांना विकला जाणारा हापूस आंबा आता थेट ३०० ते ४०० रुपयांपर्यंत घसरला आहे. बाजारात आवक वाढली, पण दर मात्र कोसळले. यामुळे उत्पादकांना अक्षरशः तोट्यात माल विकण्याची वेळ आली आहे.
दिवसें दिवस हापुसच्या दराची घसरण सुरुच आहे. स्थानिक बाजार पेठेत हापूस ची आवक देखील चांगलीच वाढली आहे. बदलत्या हवामाना मुळे व पावसामुळे आता आंबा व्यावसायिकांना हे दर पाडून विकण्याची वेळ आली आहे. मात्र हापूस आंबा खाणा-यांना कमी झालेल्या दरामुळे हापूसची चव चाखने सोपे झाले आहे. हापुसचे दर आवाक्यात आल्याने लोकांनी हापूस आंबा खरेदीसाठी जिल्ह्याच्या स्थानिक बाजार पेठेत गर्दी केलेली पहावयास मिळत आहे.
हवामानाचा अनपेक्षित फटका
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे तयार फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. “आता नाही तर कधीच नाही”.. तातडीची काढणी गरजेची झाली आहे.
तयार हापूस आणि काजू तात्काळ काढून घ्यावा. ‘नूतन’ झेल्याचा वापर करून फळे सुरक्षितरीत्या तोडा. काढलेली फळे उन्हात न ठेवता झाकलेल्या ठिकाणी हलवा. काढणी सकाळी १० पूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतरच करा, असा स्पष्ट इशारा कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
भाजीपाला आणि कडधान्यांनाही धक्का
मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी यांसारख्या पिकांची अंतिम काढणी लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुगाच्या शेंगा पावसामुळे तडकू नयेत म्हणून वेळेत तोडणी करणे गरजेचे आहे.
नव्या रोपांसाठी आधार महत्त्वाचा असून वादळी वाऱ्याचा वेग ४०-५० किमी प्रतितासपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने नव्याने लावलेल्या रोपांना काठीचा आधार देणे अत्यावश्यक आहे.
ग्राहकांसाठी संधी, शेतकऱ्यांसाठी संकट
हापूस स्वस्त झाल्याने ग्राहक बाजारात गर्दी करत आहेत, पण या गोड चवीमागे बागायतदारांचे नुकसान दडलेले आहे. हवामानाचा हा अनिश्चित खेळ थांबला नाही, तर पुढील काही दिवस कोकणातील फळबागांसाठी अधिकच कठीण ठरू शकतात.
पावसामुळे व बदलत्या वातावरणाने आम्हाला आर्थिक फटका बसला आहे. दर घसरल्याने आंबा पाडून विकण्याची वेळ आली आहे. यावर्षी देखील हापूस चे उत्पादन घटले होते, त्यात आता दर ही पडल्याने सर्व खर्च ही भरुन निघणे अवघड झाले आहे. – संतोष मयेकर, आंबा व्यावसायिक, रत्नागिरी</p>
