रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी पुलाजवळ शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष आप्पासाहेब गायकवाड (वय ५१), ट्रेलर चालक आणि क्लीनर अशा तिघांचा मृत्यू झाला. तर पोलीस कर्मचारी अनिल अशोक शिंगाडे गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, नदीपात्रात वाहन कोसळल्याची माहिती ११२ क्रमांकावर मिळताच जेवण अर्धवट सोडून मदतीसाठी धावलेल्या गायकवाड यांना या अपघातात प्राण गमवावे लागले. त्यामुळे खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात वाहन कोसळल्याचा ११२ क्रमांकावर कॉल आला. त्यावेळी महामार्ग वाहतूक मदत केंद्र, हातखंबा येथील संतोष गायकवाड, अनिल शिंगाडे आणि आणखी एक कर्मचारी जेवण करत होते. माहिती मिळताच गायकवाड आणि शिंगाडे यांनी जेवण अर्धवट सोडून सरकारी बोलेरो (एमएच ०८ बीई ३५६१) मधून घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, तिसऱ्या कर्मचाऱ्याने जेवण करून येतो, असे सांगितल्याने तो थांबला. त्यामुळे तो या दुर्घटनेतून बचावला.

गायकवाड आणि शिंगाडे घटनास्थळी पोहोचले असता नदीपात्रात कुठेही अपघात झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ते माघारी फिरत असताना अंजनारी पुलाच्या सुमारे १०० मीटर अलीकडे मागून भरधाव आलेल्या २२ टायर ट्रेलरने (आरजे ०९ जीई २३९७) त्याची पोलिसांच्या बोलेरोला जोरदार धडक बसली. धडकेनंतर बोलेरो सुमारे ८० ते १०० फूट खोल दरीत कोसळली, तर ट्रेलरही १५ ते २० मीटर खोल दरीत पलटी झाला.

या अपघातातील जखमी गायकवाड आणि शिंगाडे यांना पाली ग्रामीण रुग्णालयातून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, गायकवाड यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. शिंगाडे यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात ट्रेलर चालकाचाही मृत्यू झाला. रविवारी सकाळी ट्रेलरचा क्लीनर मृतावस्थेत आढळल्याने मृतांचा आकडा तीनवर पोहोचला.

दरम्यान, ११२ क्रमांकावर आलेला कॉल खरा होता की पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती देण्यात आली होती, याचा तपास होण्याची मागणी होत आहे. कॉल करणाऱ्याची ओळख पटवून खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या दुर्घटनेमुळे अंजनारी पुलाजवळील तीव्र वळण, अवजड वाहनांचा वेग आणि महामार्गावरील अपुऱ्या सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कर्तव्य बजावताना सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.