रत्नागिरी : रत्नागिरीची अष्टपैलू कलाकार तन्वी सावंत पुन्हा एकदा नव्या आणि वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तन्वीची मुख्य भूमिका असलेली बहुप्रतिक्षित वेबसिरीज ‘किंकिणी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रचंड उत्सुकता आणि चर्चा रंगली आहे. आपल्या कसदार अभिनय, प्रभावी निवेदनशैली आणि आत्मविश्वासपूर्ण उपस्थितीने तन्वीने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘किंकिणी’च्या निमित्ताने तिच्या अभिनयाचा आणखी एक नवा पैलू पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ही वेबसिरीज सुपर सुबोध आणि कोकण कॉमेडी कट्टा या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. कोकणच्या मातीतल्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या चॅनेलवरून ‘किंकिणी’च्या माध्यमातून तन्वी सावंत कोणता नवा चमत्कार घडवणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यामुळे कोकणातील स्थानिक कलावैभवाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर पुन्हा एक सुवर्णसंधी मिळत आहे.
तन्वी सावंत हिने यापूर्वीच आपल्या अभिनय कौशल्याची भक्कम चुणूक दाखवली आहे. ‘सखाराम बाईंडर’ या अजरामर नाटकातील ‘चंपा’ ही अत्यंत आव्हानात्मक भूमिका तिने ताकदीने साकारत रसिकांची दाद मिळवली होती. या भूमिकेसाठी तिला मुंबई विद्यापीठाचे मानाचे रौप्य पदक प्राप्त झाले आहे.
‘बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ची विद्यार्थिनी असलेली तन्वी निवेदिका म्हणूनही ओळखली जाते आणि ती सातत्याने सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय आहे. तिच्या कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तिला ‘युथ आयकॉन ऑफ रत्नागिरी २०२५’ या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अभिनय आणि निवेदन या दोन्ही क्षेत्रांत आपली वेगळी छाप पाडणारी तन्वी आता ‘किंकिणी’ वेबसिरीजच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.

