रत्नागिरी : मिरजोळे–उक्षी मार्गावरील फणसवले पवारकोंड येथे गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोन बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या पटवर्धन हायस्कूल व महाविद्यालयातील १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, एका बसचालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

भावे आडोम येथून विद्यार्थ्यांना घेऊन रत्नागिरीकडे येणारी बस फणसवले पवारकोंड येथे पोहोचली असता समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसशी तिची जोरदार धडक झाली. धडकेनंतर बसमधील विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढून त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनीही जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. आपल्या पाल्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होती.

या अपघातात सुजल सनगरे (१७), सिद्धेश खापणे (१७), तन्वी रेवाळे (१६), आदिती सत्यवान कांबळे (१७), तेजस्विनी अशोक खापणे (१७), कल्याणी रेवाळे (१७) यांच्यासह एकूण १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले आहेत. सर्व जखमी भावे आडोम येथील रहिवासी असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.