रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गोवंशीय हत्या, अवैध वाहतूक, अवैध मांसविक्री तसेच संबंधित बेकायदेशीर कृत्यांना प्रभावी आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे.पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६, प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ अंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना संबंधित कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार २३ मे २०२६ पासून जिल्हास्तरावर चार विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात येवून जिल्ह्यातील चारही पोलीस उपविभागांमध्ये कार्यरत आहेत.गोवंशीय अवैध वाहतूक, गोवंशीय हत्या, तस्करी, अवैध मांसविक्री तसेच संबंधित बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळताच तातडीने छापे टाकून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश या पथकांना देण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीस उपविभागासाठी स्वतंत्र कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले असून, सातत्याने नाकाबंदी व तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

गोवंशीय तस्करीत वारंवार सहभागी होणाऱ्या व्यक्ती किंवा संघटित टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिला आहे. अशा गुन्ह्यांमध्ये संघटित स्वरूपात सहभाग आढळल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोकाका) अंतर्गतही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या विशेष मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गावपातळीवर माहिती संकलन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, गोवंशीय अवैध वाहतूक, गोवंशीय हत्या किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळाल्यास संबंधित नोडल अधिकारी, भरारी पथकातील पोलीस अधिकारी, डायल ११२ या आपत्कालीन हेल्पलाईनवर किंवा थेट पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या ८८५७८४८१५७ या मोबाईल क्रमांकावर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.