रत्नागिरी : महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय पुराणिक यांनी केले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई आयोजित अर्ध-न्यायिक सुनावणी व आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस सचिव पंकज देवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, आयोगाचे सदस्य अतुल देसाई, प्रविण भुजाडे, गीतांजली बुटी, शुभांगी तांबट, मिलन जंगम, जिल्हा पोलीस उपअधीक्षक राधिका फडके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बालकांचे हक्क, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य आणि सन्मानाचे रक्षण ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे अ‍ॅड. पुराणिक यांनी सांगितले. डिजिटल युगात बालकांसमोरील धोके वाढत असून सायबर सुरक्षा, मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती आणि मुलींच्या सुरक्षेबाबत जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

बालकांशी संबंधित बातम्या प्रसिद्ध करताना प्रसारमाध्यमांनी गोपनीयतेचे भान राखावे, विशेषतः लैंगिक अत्याचार, बालमजुरी, बालविवाह किंवा कौटुंबिक वादांतील बालकांची ओळख उघड होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन आयोगाने केले.

बालविवाह आणि बालमजुरीविरोधात प्रभावी जनजागृती करण्यासह ‘चाइल्ड लेबर सेल’ सक्रिय करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. शाळांमध्ये ‘सखी सावित्री समिती’ स्थापन करणे तसेच गाव, तालुका आणि वॉर्ड स्तरावर बाल संरक्षण समित्या सक्षम करण्यावर भर देण्यात आला. महिला व बालकांच्या समस्यांबाबत तक्रारींसाठी आयोगाच्या ई-मेल, संकेतस्थळ आणि ‘चिराग अ‍ॅप’चा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.