रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे गुरुवारी सायंकाळी अंगावर शहारे आणणारी घटना घडली. घरामागील वाशिष्ठी नदीच्या घाटावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या अजस्त्र मगरीने अचानक हल्ला केला. मगरीने महिलेचा पाय जबड्यात पकडून तिला खोल पाण्यात ओढण्यास सुरुवात केली. मात्र, प्रसंगावधान राखत महिलेने काठावरील दगडाला घट्ट पकडून ठेवले आणि तिच्या अवघ्या १० वर्षांच्या लेकीने धाडसाने आईचा हात पकडून तिला पाण्याबाहेर खेचल्याने तिचा जीव थोडक्यात बचावला.
नंदिनी भुपेंद्र पवार (वय ३५, रा. वालोपे गणेशवाडी) या सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास आपली १० वर्षांची मुलगी स्वर्णी हिच्यासोबत वाशिष्ठी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धूत असतानाच पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक नंदिनी यांच्यावर झडप घातली. क्षणार्धात मगरीने त्यांचा पाय जबड्यात पकडला आणि त्यांना खोल पाण्यात ओढण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्याने नंदिनी घाबरल्या. त्यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड केली; मात्र संकटाच्या त्या क्षणीही त्यांनी प्रसंगावधान राखत एका हाताने नदीकाठावरील मोठ्या दगडाला घट्ट पकडून ठेवले.
आईला मगर पाण्यात ओढत असल्याचे पाहताच स्वर्णीने अजिबात न घाबरता थेट आईच्या मदतीसाठी धाव घेतली. तिने आईचा हात घट्ट पकडला आणि आपल्या इवल्याशा हातांनी सर्व ताकद पणाला लावत तिला पाण्याबाहेर खेचले. १० वर्षांच्या मुलीच्या या अतुलनीय धाडसामुळे नंदिनी पवार यांचा जीव वाचला. या थरारक घटनेत नंदिनी पवार जखमी झाल्या असून त्यांना तातडीने कामथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी तातडीने हालचाली करत वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक के. डी. इरमले (कोळकेवाडी), वनरक्षक रा. भा. गुंटे (रामपूर), लिपिक एस. ए. कलावंत आणि आर. आर. टी. सदस्य अथर्व घाग यांच्यासह कामथे रुग्णालयात धाव घेतली. वन अधिकाऱ्यांनी नंदिनी पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला.
दरम्यान, या घटनेनंतर वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचा गंभीर इशारा दिला आहे. पावसाळ्यामुळे सध्या वाशिष्ठी नदीत मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांनी नदीत पोहणे, कपडे किंवा जनावरे धुण्यासाठी नदीकाठी जाणे टाळावे. विशेषतः लहान मुलांना नदीपात्रापासून दूर ठेवावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
