रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण सागरी किनारपट्टीचा विकास, मच्छीमार बांधवांच्या सुविधांमध्ये वाढ आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जेटी उभारणी, जोडरस्त्यांची निर्मिती आणि समुद्राच्या उधाणापासून गावांचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक बंधारे बांधण्याच्या सहा मोठ्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या विकासकामांसाठी गृह (बंदरे) विभागाने एकूण ८५ कोटी ८४ लाख ३० हजार ५८४ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळाने या विकासकामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. त्यानंतर मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि खनिकर्म मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या आराखड्यांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या किनारपट्टीवरील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामांना आता गती मिळणार आहे.

गुहागर तालुक्यातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचाही या मंजुरीमध्ये समावेश आहे. अंजनवेल येथील भोईवाडी जेट्टीपर्यंत जाणाऱ्या जोडरस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी १४ कोटी १० लाख ४० हजार ५४४ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या रस्त्यामुळे जेट्टीपर्यंतची वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.तसेच पडवे समुद्रकिनाऱ्यावर वाढत्या किनारधुपीला आळा घालण्यासाठी आणि लगतच्या वस्तीचे संरक्षण करण्यासाठी आधुनिक संरक्षक बंधारा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी १४ कोटी ९ लाख ८६ हजार ४६७ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकल्पांमुळे गुहागर तालुक्यातील सागरी पर्यटनाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. किनारपट्टी भागातील गावांचे संरक्षण, मत्स्यव्यवसायासाठी आवश्यक सुविधा आणि पर्यटनवाढ या तिन्ही बाबींना या विकासकामांचा लाभ होणार आहे. परिणामी, मच्छीमार, स्थानिक व्यावसायिक तसेच पर्यटकांसाठी नवीन संधी निर्माण होण्याबरोबरच किनारपट्टी भागाच्या अर्थकारणालाही बळकटी मिळणार आहे.