रत्नागिरी : रत्नागिरी शहर आणि तालुका परिसरात गेल्या पंधरवड्यापासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यवसाय अक्षरशः मरणासन्न अवस्थेत पोहोचला आहे. पर्यटन हंगाम आणि हापूस आंब्याच्या मोसमाच्या तोंडावर निर्माण झालेल्या या संकटामुळे हॉटेल मालक, कामगार आणि पर्यटक तिघेही कोंडीत सापडले आहेत.
पुरवठा साखळीतील गोंधळाचा फटका इतका तीव्र बसला आहे की, अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील हॉटेल लँडमार्क येथे सोमवारी झालेल्या जाहीर सभेत व्यावसायिकांनी प्रशासन आणि गॅस एजन्सींविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.
हॉटेल असोसिएशनने यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार अत्यावश्यक गरज असलेल्या ८० हॉटेल व्यावसायिकांची यादी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात केवळ २५ ते ३० जणांनाच सिलिंडर मिळाले असून उर्वरित ५० हून अधिक व्यावसायिक अद्याप प्रतीक्षेत आहेत.
रत्नागिरी शहरात दररोज सुमारे २०० सिलिंडरची गरज असताना एजन्सींकडून अत्यल्प पुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली. “एका सिलिंडरवर दिवसभराचा व्यवसाय कसा चालवायचा?” असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
पर्याय म्हणून काही हॉटेल चालकांनी महागड्या डिझेल शेगड्या खरेदी केल्या; मात्र पेट्रोल पंपांकडून कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार मिळत असल्याने ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे.
पर्यटन हंगामाच्या तोंडावरच ही टंचाई निर्माण झाल्याने पर्यटकांची सोय कशी करायची, हा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. हॉटेल व्यावसायिकांना किमान आठवड्याला तीन सिलिंडर मिळावेत, अशी ठाम मागणी सभेत करण्यात आली.
शासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती सुरळीत न केल्यास हॉटेल व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा व्यावसायिकांनी दिला. या संदर्भातील सविस्तर निवेदन मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे.
या सभेला हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, उपाध्यक्ष उदय लोध, सचिव सुनील देसाई यांच्यासह शहर व तालुक्यातील १०० हून अधिक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.
