रत्नागिरी : राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वपूर्ण बदल होत असून, जिल्हाध्यक्ष निवडीची ‘थेट नियुक्ती’ पद्धत आता बंद करण्यात येत आहे. याऐवजी कार्यकर्त्यांच्या पसंतीला प्राधान्य देत जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सचिव दानिश अब्रार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागांत विभागणी करून दोन स्वतंत्र जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. आतापर्यंत ही निवड वरिष्ठ पातळीवरून केली जात होती. मात्र, नव्या पद्धतीनुसार कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मतांच्या आधारे नेतृत्व निश्चित केले जाईल.
“पक्षाला केवळ झेंडे लावणारा किंवा खुर्चा उचलणारा कार्यकर्ता नको, तर लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणारा खंबीर कार्यकर्ता हवा आहे. आता कार्यकर्ताच आपला नेता निवडणार आहे,” असे अब्रार यांनी स्पष्ट केले.
जिल्हाध्यक्ष पदासाठी एप्रिलपर्यंत इच्छुकांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २० एप्रिलपर्यंत राज्यभर कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली जातील. त्यानंतर मे अखेरीस किंवा पुढील दीड महिन्यात नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पक्षाचा कोणताही निष्ठावान कार्यकर्ता किंवा नेता या पदासाठी अर्ज करू शकणार आहे. रत्नागिरीचा भौगोलिक विस्तार लक्षात घेऊन संघटना अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश कीर, नगराध्यक्षा हुस्नबानू खलिपे, विद्यमान जिल्हाध्यक्ष तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नव्या निर्णयामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“कार्यकर्ता हा केवळ खटले अंगावर घेण्यासाठी नसून, त्याला सत्तेत आणि निर्णयप्रक्रियेत स्थान मिळणे आवश्यक आहे. ही नवी प्रक्रिया कार्यकर्त्यांना बळ देणारी ठरेल,” असेही अब्रार यांनी सांगितले.
