रत्नागिरी : भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने सोमवारी रत्नागिरीत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली. ‘एसआयआर’ प्रक्रियेमुळे मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित केले जात असल्याचा दावा करत काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा अथवा त्यांना पदावरून बडतर्फ करावे, तसेच ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सुरू झालेल्या या मूकमोर्चात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर, सरचिटणीस हुस्नबानू खलिफे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जमीर खलिफे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असली तरी सध्या तिच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. एसआयआरच्या नावाखाली गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयांवर त्यांच्या सहकाऱ्यांकडूनही आक्षेप नोंदविले गेले आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी या मुद्द्यावर सातत्याने आवाज उठवत असल्याचे सांगत हे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवून मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे कीर यांनी सांगितले.
हुस्नबानू खलिफे यांनी हा मोर्चा काँग्रेसच्या २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान सुरू असलेल्या ‘लोकशाही बचाव आंदोलना’चा भाग असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील मतदारांना मतदानापासून वंचित करणारी ठरत असल्याचा आरोप असलेली एसआयआर प्रक्रिया तातडीने रद्द करावी, या प्रक्रियेस जबाबदार असलेल्या मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
ईव्हीएमविरोधातही काँग्रेस आक्रमक
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी ईव्हीएमऐवजी पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणीही काँग्रेसने केली. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला.
