रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात सहकार विभागाने मोठी प्रशासकीय कारवाई करत विविध नियमभंग, त्रुटी आणि आवश्यक निकषांची पूर्तता न करणाऱ्या तब्बल ७६ सहकारी संस्थांची नोंदणी कायमस्वरूपी रद्द केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील निष्क्रिय आणि अकार्यक्षम संस्थांमध्ये खळबळ उडाली असून सहकार क्षेत्रात शिस्त प्रस्थापित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

सहकार विभागाच्या माहितीनुसार, नोंदणी रद्द झालेल्या संस्थांव्यतिरिक्त आणखी १०० सहकारी संस्थांवर अवसायन (लिक्विडेशन) प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या एकूण १७७ संस्था अवसायनाच्या टप्प्यात आहेत. विशेष बाब म्हणजे, या प्रक्रियेदरम्यान केवळ एका संस्थेचे यशस्वी पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.

दरम्यान, सहकारी संस्थांमधील आर्थिक पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी जिल्हाभर लेखापरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. शासकीय, सनदी आणि प्रमाणित लेखापरीक्षकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील ३ हजार २६८ संस्थांना लेखापरीक्षणाचे निर्देश देण्यात आले होते. त्यापैकी २ हजार १७५ संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असून १ हजार ९३ संस्था अद्याप प्रक्रियेपासून दूर आहेत.

जिल्ह्यातील नागरी गृहनिर्माण संस्था (हाउसिंग सोसायट्या) संख्येने सर्वाधिक असल्याने त्यांच्याकडेच लेखापरीक्षणाची सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. एकूण २ हजार ७९ गृहनिर्माण संस्थांपैकी १ हजार २७१ संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असले तरी ८०८ संस्थांची तपासणी अद्याप बाकी आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागातील विविध कार्यकारी संस्थांची कामगिरी समाधानकारक दिसून आली आहे.

जिल्ह्यातील ३४८ विविध कार्यकारी संस्थांपैकी ३४३ संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असून केवळ ५ संस्थांची प्रक्रिया शिल्लक आहे. १९२ नागरी पतसंस्थांपैकी १६८ संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असून २४ संस्था प्रलंबित आहेत. पगारदार पतसंस्थांच्या बाबतीत ७९ पैकी ७१ संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असून ८ संस्थांचे काम अद्याप बाकी आहे.

सहकार विभागाच्या कठोर भूमिकेमुळे जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांनीही आर्थिक व्यवहार, लेखे व आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नोंदणी रद्दीकरण, अवसायन प्रक्रिया आणि लेखापरीक्षण मोहिमेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.