रत्नागिरी : पाच रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चिन्ह असल्यास १५ लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून तब्बल ९ लाख २१ हजार ७०१ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील एका तरुणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित चव्हाण (रा. उत्तर प्रदेश) असे संशयिताचे नाव असून ही घटना ऑगस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत भाटीमिऱ्या येथील नवीन दत्तमंदिर परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमंत मारुती शिवलकर (वय ५१) यांनी फेसबुकवरील रिल्समधील जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीत पाच रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चिन्ह असल्यास त्याबदल्यात १५ लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवण्यात आले होते. त्यानुसार संशयिताने विविध बँक खात्यांमध्ये तसेच गुगल पेच्या माध्यमातून वेळोवेळी रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून शिवलकर यांनी एकूण ९.२१ लाख रुपये पाठवले.
याशिवाय, फिर्यादींच्या नावावरील बँक खात्यांचा वापर करून इतर नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचेही समोर आले आहे. संबंधितांकडून जमा झालेली रक्कम फिर्यादींच्या खात्यात वळवून नंतर ती काढून घेण्यात आली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. वयोमानामुळे फिर्यादी नियमितपणे बँकेत न गेल्याने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नव्हता. मात्र बँकेकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.
