रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील धनजीनाका येथे एका नॉव्हेल्टी दुकानात काम करणा-या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवार ८ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. मुरुगवाडा येथे राहणारे अलीसाहेब हसनमियों मुकादम (वय ४०) यांची मुलगी अजबा अलीसाहेब मुकादम ही नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ९ वाजता धनजीनाका येथील एका नॉव्हेल्टी दुकानात कामावर गेली होती. मात्र नेहमीप्रमाणे ती दुपारी ३ वाजेपर्यंत घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबियांना काळजी वाटू लागल्याने वडिल अलीसाहेब मुकादम यांनी तात्काळ अजबा हिचे मालक अनसार मेमन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अजबा दुपारी २ वाजता दुकानातून निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी मांडवी, भाट्ये, एस.टी. स्टँड परिसरात तिचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता ती सापडू शकली नाही.
अलीसाहेब मुकादम यांनी या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहरातून अल्पवयीन मुलीचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस अजबा अलीसाहेब मुकादम हिचा शोध घेत आहेत.